कृषी

शेतकर्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या निविष्ठांचा वापर करावा- कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : कृषि विद्यापीठे सदैव शेतकरीभिमुख संशोधन करतात. शेतकर्यांच्या शेतीतील अडचणी जाणुन घेवून त्यावर संशोधन करुन शेतकरीभिमुख तंत्रज्ञान शिफारशी, वाण, सुधारित अवजारे विकसीत केले जातात. शेतकर्यांकडून विद्यापीठाच्या वाणांना पहिली पसंती असते. या व्यतिरिक्त कृषि विद्यापीठे दर्जेदार कृषि निविष्ठांची उत्पादन करतात. यामध्ये जैविक खते, जैविक किडनाशके व फुले द्रवरुप सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा समावेश होतो. तरी शेतकर्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या निविष्ठांचा वापर करावा असे आवाहन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.

कृषि विभागाकडून या विद्यापीठ उत्पादित कृषि निविष्ठांची दरवर्षी खरेदी केली जाते व ती शेतकर्यांपर्यंत पोहचविली जातात. यामुळे शेतकर्यांना दर्जेदार कृषि निविष्ठा मिळतात व कृषि विभागाला बाजारपेठेपेक्षा कमी भावात दर्जेदार कृषि निविष्ठा मिळतात. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विद्यापीठाला कृषि विभागाच्या वतीने निविष्ठांच्या मागणीपत्रांची प्रतीक्षा होती.

परंतु, मागणीपत्र न आल्यामुळे विद्यापीठाने कृषि विभागाकडे चौकशी केली असता कृषि आयुक्तालयाने यावर्षी केवळ महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून निविष्ठा खरेदी करण्याचे आदेश असल्याचे सांगितले. असे झाल्यास विद्यापीठाला मिळणार्या उत्पन्नामध्ये घट येवू शकते. वास्तविक विद्यापीठाच्या निविष्ठा किंमत व दर्जा याबाबतीत उच्च दर्जाच्या असतात.

यासंदर्भात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि) आणि राज्याचे कृषि आयुक्त यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये कुलगुरुंनी म्हटले आहे की, यावर्षी पाऊसमानाची परिस्थिती पाहता आणि शेतकर्यांना वाजवी दरात या निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने यावर्षी फुले द्रवरुप सुक्ष्म अन्नदव्यांचा (ग्रेड-2) व इतर जैविक उत्पादनांचा विक्री दर कमी केला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button