अहमदनगर

सेवानिवृत्तीनंतर बेरोजगारांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत – प्रताप देवरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नोकरी म्हणजे आपल्या ज्ञान परिश्रमाला आलेले फळ होय. शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्याला नोकरी मिळाली पाहिजे, आजच्या युवकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागते, ते निराश होतात, त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर आपण बेरोजगारांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत असे मत स्नेह ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रताप देवरे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीमध्ये प्रताप देवरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल आणि बेरोजगार युवकांच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचा विविध सेवाभावी संस्था, व्यक्तींतर्फे सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्रताप देवरे यांच्या कार्य, विचारांचा परिचय करून दिला. बेरोजगारांचा विचार मानधनावरील शिक्षक पदासाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी अर्ज करू नये ही प्रताप देवरे यांनी घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. या विचाराला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे. जर सेवानिवृत्त शिक्षकांनी कोणत्याही आर्थिक पदभरतीसाठी अर्ज केले तर अनेक बीएड., डी.एड. बेरोजगार राहतील. त्यासाठी असे अर्ज करू नये असे आवाहन केले.

देवरे यांनी धाडसाने भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक केले. माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा.शिवाजीराव बारगळ, सुखदेव सुकळे यांनी देवरे यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मत व्यक्त केले. प्रताप देवरे यांची श्रीरामपूरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेच्या जेष्ठ सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल नगरपालिका पतसंस्था चेअरमन प्रकाश सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात मगरे, लक्ष्मणराव मोहन यांनी सत्कार केला. त्यावेळी प्रताप देवरे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, समाजात चांगले काम करीत राहिले की सेवाभावी माणसे निश्चित दखल घेतात. रयत शिक्षण संस्थेतील गुरुवर्य आणि सामाजिक सेवाभावी व्यक्तींनी केलेला सन्मान माझ्या सत्कार्याला बळ आणि प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करून नगरपालिका पेन्शनर्स अशोसिएशन जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करताना, बोरावके कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अनुभवाविषयी विचार व्यक्त केले.

श्रीरामपूर येथे भव्य असे पेन्शनर्स भवन उभारण्याचे कार्य अनेकांच्या सहकार्यातून सुरु झाल्याचे सांगितले. स्नेहग्रुप या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश सपकाळ, चंद्रकात मगरे, लक्ष्मणराव मोहन यांनी प्रताप देवरे यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. गौरव देवरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सौ. प्रतिभाताई देवरे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button