कृषी

संशोधनासाठी सांघीक प्रयत्नांबरोबरच पायाभूत सुविधांची गरज- कुलगुरु डॉ. संजय सावंत

चारही कृषि विद्यापीठांचे 19 वाण, 13 कृषि यंत्रे, आणि 197 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

राहुरी विद्यापीठ : सध्या फळपिकांमध्ये घन लागवड पध्दतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होत असून ती भविष्याची गरज होऊ पहात आहे. घन लागवड पध्दतीमध्ये योग्य कार्यपध्दतीचा वापर होण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. कृषि विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन शेतकर्यांसाठी खुप महत्वाचे आहे. संशोधन करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांबरोबरच पायाभूत सुविधांची गरज असल्याचे प्रतिपादन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी केले.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषि विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 51 वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ संजय सावंत बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, परभणी कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलसचिव प्रमोद लहाळे, चारही कृषि विद्यापीठांचे संचालक डॉ. पी.ए. सावंत, डॉ. डी.एन. गोखले, डॉ. एस.एस. माने, डॉ. बी.जी. देसाई आणि डॉ. डी.बी. उंदिरवाडे उपस्थित होते.

यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतकरी व उद्योग यांच्या प्रश्नांवर संशोधनाचे प्रकल्प तयार करावे लागतील. जेणेकरुन शेतकर्यांच्या तसेच उद्योगांच्या समस्यांवर उपाय काढता येईल. परभणी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी म्हणाले की चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन एकत्रीतपणे राष्ट्रीय पातळीवर मांडावे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्यातील संशोधनाचा प्रभाव दिसेल. संशोधन हे एकट्याचे काम नसून ते टीमवर्क आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे.

अकोला कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख म्हणाले की एक गाव एक वाण या प्रकारे एका वाणाचे एक क्लस्टर तयार केल्यास त्याचा परिणाम मोठा होईल. एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल विभागनिहाय झाले तर शेतकर्यांना मोठा आधार मिळेल. कृषि आयुक्त श्री. सुनिल चव्हाण आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की ज्वारी पिकामध्ये काढणीसाठी मोठा खर्च मजुरीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. याकरीता ज्वारी सोंगणीसाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय शोधावा लागेल. शेतकर्यांना संशोधनाच्या माध्यमातून बॅकअप दिला तर शेतीसाठी चांगले दिवस येतील. मार्केटींग हा विषय शेती उत्पादनासाठी फार महत्वाचा असून शेती फायद्यात येण्यासाठी मार्केटींगवर भर द्यावा लागेल.

या बैठकीत चारही कृषि विद्यापीठाच्या 20 वाण, 13 यंत्रे व 233 शिफारशी सादर केल्या होत्या. चर्चेअंती चारही कृषि विद्यापीठांचे 19 वाण, 13 कृषि यंत्रे आणि 197 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. याप्रसंगी चारही कृषि विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनास मान्यवरांनी भेट दिली. या कार्यक्रमामध्ये वर्षभरात सेवानिवृत्त होणार्या 25 शास्त्रज्ञांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तांत्रिक सत्रातील विविध गटांमध्ये झालेल्या चर्चेतील निष्कर्षांचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी दापोली विद्यापीठाचे डॉ. प्रमोद सावंत, परभणी विद्यापीठातील डॉ. काळबांडे, अकोला विद्यापीठाचे डॉ. पासलवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी तर आभार डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी मानले. समारोप सत्राचे संकलन डॉ. पवन कुलवाल आणि डॉ. पंडित खर्डे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button