ठळक बातम्या

‘श्रीरामपूर पञकार संघ’ हा आपल्या आदर्श कार्याने निश्चितच लोकप्रिय होईल – प्राचार्य टी. ई शेळके

बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर ही आधुनिक नगरी आहे. अनेकांच्या आत्मीय योगदानातून या शहराचा विकास झाला आहे, होत आहे, त्यामध्ये पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा आधारवड आहे, विश्वास, न्याय, आपलेपणा, मानसिक आधार आणि जवळीक असणारे माध्यम म्हणजे पत्रकार होय. यादृष्टीने नुकताच स्थापन झालेला ‘श्रीरामपूर पत्रकार संघ’ भविष्य काळात आपल्या आदर्श कार्याने निश्चितच लोकप्रिय होईल, असा विश्वास माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केला.

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे ‘श्रीरामपूर पत्रकार संघ’ नूतन पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सन्मान केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. अध्यक्ष व उपस्थितांचे सत्कार केले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिष्ठानने 30 जानेवारी 2018 पासून केलेल्या कार्याची माहिती दिली.

‘श्रीरामपूर पत्रकार संघ’ पदाधिकारी अध्यक्ष – अशोकराव गाडेकर ( दैनिक सार्वमत ), कार्याध्यक्ष – विष्णू वाघ ( दैनिक पुढारी ), उपाध्यक्ष – विकास अंत्रे ( दैनिक पुण्यनगरी), उपाध्यक्ष – करण नवले ( दैनिक राष्ट्र सह्याद्री ),सचिव – प्रकाश कुलथे ( दैनिक स्नेहप्रकाश ), खजिनदार – अनिल पांडे ( दैनिक केसरी ), सहसचिव – महेश माळवे ( दैनिक सकाळ ), कार्यकारिणी सदस्य असलेले नवनाथ कुताळ ( दैनिक दिव्य मराठी ), शिवाजीराव पवार ( दैनिक लोकमत ), राजेंद्र बोरसे ( दैनिक सार्वमत ), रवी भागवत ( दैनिक आपलं महानगर ) आदिंच्या निवडीचा आनंदमय, गौरवात्मक अभिनंदन करण्यात येऊन उपस्थितांना सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, पत्रकार हा समाजातील खूपच महत्वाचा घटक आहे. लोकांना आपल्या समस्या, अन्याय, अडचणी मांडण्याचे एक विश्वासाचे, जवळचे साधन म्हणून प्रसार माध्यम वाटते. नियुक्ती झालेले सर्वच पदाधिकारी लोकमनात प्रिय होतील अशी भावना व्यक्त करीत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या अशा प्रेरणादायी उपक्रमाबद्दल कौतुक केले. यावेळी अशोकराव गाडेकर, करण नवले, नवनाथ कुताळ, शिवाजीराव पवार, रवी भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.

श्रीरामपूर पत्रकार संघ हा सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम करणार आहे. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आमचा केलेला हा सन्मान आमच्या अधिक चांगल्या पत्रकारिकतेला जाणीवशील ठेवणारा आहे. आमची जबाबदारी आम्हाला सक्षमपणे करण्यासाठी प्रेरक ठरणारी असल्याचे सांगून सुखदेव सुकळे यांनी आपल्या पेन्शनमधली 25 टक्के रक्कम सामाजिक सेवाभावासाठी बाजूला ठेवली हे मोठे योगदान आहे, त्यांचे वेगळेपण आहे. त्यांचे सेवाभावी कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार पत्रकारांनी आपल्या मनोगतातून काढले. प्रा. रामचंद्र राऊत यांनी नूतन पत्रकार पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. सन्मानचिन्हे तयार करणारे ओमप्रकाश परदेशी यांचा अशोकराव गाडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, प्रा. डॉ. चंद्रकात रुद्राक्ष, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा.अशोकराव तुसे, प्रा. डॉ. बाळासाहेब बढे, रामराव पडघनदादा, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, सुरेश कल्याणकर, पत्रकार बाबासाहेब चेडे, माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे, रंगराव माने, प्रीतम शेज्ज्वळ आदी उपस्थित होते. सुरेश बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सौ. उज्ज्वलाताई बुरकुले, संजय बुरकुले, सौ.सुरेखाताई बुरकुले, संकेत बुरकुले आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठान सदस्य सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button