नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी बच्चु कडु यांना साकडे
राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान त्वरित मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी माजी मंत्री ना. बच्चु कडु यांना साकडे घातले आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पाटोदा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील सुरेशराव लांबे पाटील यांनी माजी मंत्री ना. बच्चु कडु यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. परंतु नगर जिल्ह्यात आज रोजी कोणत्याही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही.
माजी मंत्री ना. बच्चु कडु यांच्याशी चर्चा करताना राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील.
यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ना. बच्चु कडु यांनी लक्ष घालून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान त्याचबरोबर कांदा, कापुस, ऊस व इतर शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे. तसेच या पुढील काळात हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल विकल्यास शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात त्वरित मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
या शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, युवा तालुका प्रमुख ऋषीकेश इरुळे, उपतालुकाप्रमुख युनुस देशमुख, बाबासाहेब भड आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.