कल्पना चावला यांचा ६१वा जन्मदिन बेलापूर येथे उत्साहात साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : १७ मार्च हा कल्पना चावला यांचा जन्मदिन शनिवार दि.२५ मार्च रोजी जे.टी.एस.विद्या संकुलात कल्पना चावला कक्ष ( इ.७ ब ) मधील विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक संजय भिसे यांच्या नेतृत्वाखाली बालसभेच्या रूपाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम कुंभार, उपमुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी, ज्येष्ठ शिक्षक रघुनाथ वाघ, पोपट गावडे तसेच सर्व शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भिसे यांनी केले. अध्यक्षीय सूचना कु.सोफिया शेख ने मांडली. चि.आयुष्य तेलोरे यांने अनुमोदन दिले. सर्व मान्यवरांच्या हस्ते कल्पना चावला यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांना शाल व बुके देऊन चि.विशांत अमोलिक याने सन्मानित केले.
कल्पना चावला कक्षाच्या वतीने विद्यालयाला कल्पना चावला यांची छानशी प्रतिमा आणि त्यांचे जीवन चरित्र पर पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कल्पना चावला यांचे बालपण, शिक्षण, वैवाहिक जीवन, अंतरिक्ष कामगिरी, कराड येथील कल्पना चावला केंद्र याबद्दल भाषणे केली. कु.अंजुम शेख, कु.सोनाली सोनवणे, कु.सलोनी राक्षे, कु.प्रीती शेलार, चि.अबुझर बागवान, चि.दशरथ जाधव या विद्यार्थ्यांचा भाषणात सहभाग होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंभार व उपमुख्याध्यापक पुजारी यांनी भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक भिसे यांचे स्नेहवस्त्र आणि बुके देऊन कौतुक करुन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
शेवटी कु.सोनल पानसरे हिने आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन कु.ऋतुजा सोनवणे हिने केले. उपस्थित सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यानिमित्ताने कल्पना चावला कक्षातील सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक भिसे यांनी माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते बिस्किट पुड्यांचे वाटप केले.