शिक्षणवारी ज्ञान पंढरी
Trending

सांख्यिकी अन्वेषक परीक्षेत यशस्वी बनकर यांचा कौंटुबिक, शैक्षणिक आदर्श घेतला पाहिजे – प्राचार्य टी.ई.शेळके

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : पढेगाव येथील श्रीकांत पोपटराव बनकर यांनी पढेगाव भागातील आडवळणी शेतशिवारी भागात शेती करीत सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. अवघड विषयात मिळविलेली गुणवत्ता जशी कौतुकास्पद आहे, तसेच त्यांनी शेती, घरगुती कामे, गाईगुरे, अनेक छोट्या छोट्या उपक्रमात कौशल्य मिळविले हे अभिनंदनीय असून त्यांचा आदर्श आजच्या युवकांनी घेतला पाहिजे, असे मत ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावसारख्या शेतशिवारी बनकर वस्तीवर श्रीकांत बनकर यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी प्राचार्य शेळके बोलत होते. बाळासाहेब बनकर यांनी स्वागत करून बनकर परिवाराचा परिचय करून दिला. यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, पोपटराव बनकर, विश्वासराव बनकर, बापूसाहेब बनकर, सौ. रोहिणीताई बनकर, सौ. सुजाताताई बनकर, पुष्पाताई बनकर, सौ. संध्याताई बनकर, कु. कल्याणीताई बनकर, स्वप्नील बनकर, उंदीरगाव येथील संदीपान खुळे आदींसह बनकर परिवार उपस्थित होते.

प्राचार्य टी. ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीकांतसह सर्वांना पुस्तके भेट देत अभिनंदनपूर्वक सत्कार केला. बाळासाहेब बनकर यांनी अनेकांना पेढे भरवत श्रीकांतने आमच्या बनकर परिवारचा नावलौकिक केला, याबद्दल आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके यांनी बनकर परिवार हा सर्वत्र प्रिय आहे. श्रीकांतने केंद्रीय स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतलेल्या कम्बाईन ग्रॅज्युएट लेवल अंतर्गत घेतलेल्या सांख्यिकी अन्वेषक पदासाठी झालेल्या परीक्षेत यश मिळविले हा आदर्श ग्रामीण युवकांना प्रेरणादायी आहे, शिवाय त्यांनी शेती व कुटुंब कार्यात कमीपणा न मानता कष्ट करीत ही परीक्षा उत्तीर्ण केली. हे कौतुकास्पद असल्याचे सांगून बनकर परिवाराला धन्यवाद दिले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीकांत बनकर यांनी मायमातीशी एकरूप राहून ज्ञानसाधना केली. कु. कल्याणीताई बनकर यांनीही एम. एस्सी. केमेस्ट्रीत उच्च गुणवत्ता प्राप्त केली. श्रीकांत, कु. कल्याणीताई यांची आई सौ. रोहिणीताई, वडील पोपटराव बनकर, त्यांचा सर्व परिवार शेतकरी वर्गाला आदर्शमय आहेत. जेथे ज्ञानदीप उजळतो आणि कृषी संस्कृतीला तो बळ देतो, असा ग्रामीण समाज प्रगती करतो. मुले हीच घराची खरी श्रीमंती आहे, असे सांगून मुलांनी आपल्या परिवाराला विसरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत बनकर यांनी आपण ग्रामीण भागाला सदैव साक्षी ठेवून कार्य करू असे सांगून आनंद व्यक्त केला. सौ. रोहिणीताई बनकर यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button