अहमदनगर
पत्रकार दोंदेंसह कुटूंबियांना पोलिस संरक्षण द्या; रिपाइंचे शहराध्यक्ष साळवे यांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
राहुरी शहर | अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील पत्रकार सागर दोंदे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना पोलिस संरक्षण देऊन सदरच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राहुरी शहराध्यक्ष सचिन साळवे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संबंधित घटनेत लक्ष घालून तत्काळ गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा तसेच पत्रकारांना संरक्षण द्यावे, असे आदेश पोलिस अधिक्षक ओला यांना करावे, अशी मागणी आरपीआय आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची कामे करीत असताना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना नेहमीच अडसर निर्माण होत असतो. तसेच दि. २४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी राहुरी-ताहाराबाद रस्त्यावर आडवुन पत्रकार सागर दोंदे यांच्या गळ्याला चाकु लावुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
पत्रकार बांधव समाजातील लोक कल्याणकारी प्रश्न जनतेसमोर आणण्याचे काम करत असतो. अशा पत्रकारांना धमकी देणे, हल्ला करणे हि बाब अतिशय गंभीर आहे. सदर घटनेचा आर.पी.आय. (आठवले गट) यांच्या वतीने निषेध व्यक्त करीत असून पत्रकार सागर दोंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण द्यावे. तसेच पत्रकार दोंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तपास जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष एलसीबीच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा.
राहुरी तालुक्यातील दैनिक सार्वमंथनचे मुख्य संपादक अनिल कोळसे यांच्यावरही यापूर्वी हल्ला व दमबाजी करण्याची घटना घडली आहे. तसेच अवैध व्यवसाय, सावकारकी, बिंगो, मटका, दारु, जुगार या बातम्या छापल्याच्या रागातून काही दिवसांपुर्वी दैनिक सार्वमंथनचा अंक जाळण्याचाही प्रकार घडलेला आहे. संपादक कोळसे व त्यांच्या कुटूंबाला देखील विनामुल्य पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी सचिन साळवे यांनी केली आहे.