अहमदनगर

आरडगाव येथील आश्रमात येऊन सहज योग साधनेचा लाभ घ्यावा – श्रीमती कल्पना दिदी

राहुरी : तालुक्यातील आरडगाव येथील श्री निर्मलधाम आश्रमात येऊन सहज योग साधनेचा लाभ पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी परिसरातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, असे आवाहन परमपूज्य श्री माताजींच्या सुकन्या श्रीमती कल्पना दिदी यांनी केले.
तालुक्यातील आरडगाव येथील श्री निर्मलधाम आश्रमात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ध्यान मंडपाचे उद्घाटन दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता परमपूज्य श्री माताजींच्या सुकन्या श्रीमती कल्पना दिदी यांच्या हस्ते दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी द लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबई या ट्रस्ट चे ट्रस्टी श्री शर्मा, सदस्य प्रवीण जवळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरडगाव आश्रमाचे व्यवस्थापक श्री बूगदे व त्यांच्या संपूर्ण टीम मार्फत 2 दिवसांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भजन संध्या व एकादश रूद्र पूजा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना श्रीमती कल्पना दिदी यांनी सांगितले की, आरडगाव या गावाला सहज योगाच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे. माझी आई म्हणजेच श्री माताजी निर्मला देवी यांनी सहज योग ध्यान साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील म्हणजेच 1975 ते 1987 या कालावधीत प्रचार प्रसाराचे कार्य खूप मोठ्या प्रमाणात आरडगाव येथून सुरू केले होते आणि त्यानंतर सहज योगाचा वृक्ष हा खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला.
या प्रसंगी भजन संध्याच्या कार्यक्रमासाठी दिग्गज गायक दिनेश निंबाळकर, पं. अजित कडकडे, मुखिरामजी यांनी उपस्थिती नोंदविली व आपल्या सुरेल गायनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार व त्यांचे सहकाऱ्यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन अशोक तरकसे यांनी केले.

Related Articles

Back to top button