कृषी

जाणुन घेऊयात कोण आहेत जानेवारी महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. जानेवारी महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन ज्ञानेश्वर पाटील व कृषि उद्योजक म्हणुन डॉ. रामनाथ जगताप यांची निवड झालेली आहे.
ज्ञानेश्वर पाटील हे मु. कुसुंबे, पो. घोडगाव, ता. चोपडा, जि. जळगांव येथील शेतकरी असून कृषि पदवीधर डॉ. रामनाथ जगताप हे गंगापूर रोड, जि. नाशिक येथील कृषि उद्योजक आहेत. शेतकरी आयडॉल ज्ञानेश्वर पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विकसीत वाणांची लागवड करुन भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांनी तयार केलेल्या तंत्रानुसार हरभरा पिकात पेरणी करतांना दोन ओळीत 21 इंचाचे अंतर व ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केल्याने हरभरा उत्पादनात वाढ झाली. या तंत्राचा वापर परिसरातील शेतकर्यांनी केल्यामुळे त्यांचेही उत्पन्न वाढले.
श्री. पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण 21 एकर जमिनीत गेल्या 10 वर्षापासून एप्रिल महिन्यात प्रति एकर तीन ट्रॉल्या शेणखताचा वापर केल्यामुळे त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या संपूर्ण शेतीत तणनाशकाचा वापर पूर्णपणे बंद करुन तणनियंत्रणकरीता खुरपणी तसेच कोळपणी तंत्राचा वापर केलेला आहे. त्यांनी ठिबक सिंचन पध्दतीचा 100 टक्के वापर करुन प्रत्येक पिकाच्या बियाण्यास जिवाणू खतांची बिजप्रक्रिया करुनच पेरणी केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे.
कृषि उद्योजक डॉ. रामनाथ जगताप यांनी धुळे कृषि महाविद्यालयातुन कृषि शिक्षणाची पदवी घेतलेली असून वनस्पती रोगशास्त्र या विषयात आचार्य पदवी मिळविलेली आहे. त्यांनी कृषिदुत बायो हर्बल्स, कृषिदुत ॲनॅलिटीकल लॅबोरटरी, के.बी.एच. प्लास्ट, कृषिदुत बायोहर्बल प्रा.लि. व कृषिदुत फार्मर प्राड्युसर कंपनी या पाच कंपन्यांद्वारे शेतकर्यांसाठी रसायनमुक्त आणि पर्यावरण अनुकुल अशा सेंद्रिय प्रमाणित कृषि निविष्ठांचे उत्पादन करित आहेत. त्यांची सर्व उत्पादने एन.पी.ओ.पी./ एन.ओ.पी. प्रोग्रामिंग अंतर्गत इकोसर्टद्वारे भारतीय व युरोप बाजारपेठेसाठी सेंद्रिय प्रमाणीत केलेली आहेत.
सेंद्रिय शेतीमध्ये लागणार्या रसायनमुक्त पाच निविष्ठांचे पेटंट मिळविलेले असून ते कॅप्सुल स्वरुपात जैविक नियंत्रण आणि जैविक खतांची निर्मिती करीत आहेत. त्यांच्या कंपनीद्वारे तयार केलेल्या उत्पादनांची निर्यात देशात तसेच विदेशातही होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button