अहमदनगर

नगर ते शिर्डी रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करा – देवेंद्र लांबे पाटील

राहुरी : बुधवार दि.१४ रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नगर येथे त्यांच्या कार्यालयात रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी भेट घेत नगर ते शिर्डी अवजड वाहतूक रस्ता दुरुस्तीचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आम्ही नगर ते शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहोत. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे शेकडो अपघात झालेले आहेत. शेकडो अपघातांमध्ये अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, तसेच शेकडो प्रवाशांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये राहुरी सूतगिरण ते राहुरी कारखाना या परिसरात आठ दिवसात सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. या विषयास अनुसरून ३ डिसेंबर २०२२ रोजी रस्ता दुरुस्त कृती समिती अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने दशक्रिया विधी घालण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत संबधित प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिलेले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाला देखील सुरवात करण्यात आलेली आहे.
परंतु डिसेंबर २०२२ पासून देश विदेशातून जागतिक प्रसिद्ध असलेले देवस्थान शिर्डी व शिंगणापूर या ठिकाणी भाविक येत असतात. या गर्दीच्या काळात नगर ते शिर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. याच दरम्यान अवजड वाहतुक करणारे साधने याच रस्त्यावरून वाहतूक करत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवजड वाहतूक करणाऱ्या साधनांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होवून जिवित हानी होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर ते शिर्डी या रस्ता दुरुस्तीचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून होणारे अपघात टाळण्याकामी सहकार्य करावे अशी मागणी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी केली आहे. याच आशयाचे पत्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलिस अधिक्षक यांना पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button