कृषी

भारतात कृषि संबंधीत उद्योगांना उज्वल भविष्य – उपमहासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल

महात्मा फुले कृषि विद्यापीठात एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 ची शानदार सुरुवात
राहुरी विद्यापीठ : कृषि शिक्षण घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बनून इतरांना नोकरी उपलब्ध करून द्यावी. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये कृषि संबंधित उद्योगांना उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपमहासंचालक व नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नाहेप-कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. सी. अग्रवाल बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य संजीव भोर, नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. विलास शिंदे, संगमनेर येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नवले पाटील, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल पाटील, धुळे येथील उद्योजक सरकारसाहेब जे.जे. रावळ, पुणे येथील काकडे फुडच्या श्रीमती श्वेता काकडे, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके व कार्यक्रमाचे संयोजन सचिव डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की दरवर्षी भारतातील कृषि विद्यापीठांमधून दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मार्केटमध्ये ज्याची गरज आहे त्याचा अंतर्भाव आपल्याला सध्याच्या शिक्षण पद्धतीत करावा लागणार आहे. उद्योगांमधील तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या सूचनेनुसार शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शासकीय-खाजगी भागीदारीद्वारे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्या सर्व सुखसोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांच्याकडून चांगल्या संशोधनाची अपेक्षा आपण ठेवू शकतो. विद्यार्थ्यांनीही जागतिक पातळीवर होत असलेल्या संशोधनाबद्दल जागरूक राहून ते आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्या डिजिटल सिक्वेन्स माहितीचे युग असून भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य आशादायी असल्याचे ते म्हणाले.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की उद्योजक हा एका दिवसात तयार होत नसतो तर त्यासाठी त्याच्यामध्ये खुप मोठी जिद्द, सातत्यपूर्ण कष्ट, संयमशीलता या गुणांबरोबरच आयुष्यातील महत्वाची वर्ष खर्चावी लागतात तेव्हा यशस्वी उद्योजक तयार होतो. त्यांनी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या विविध शिक्षांपासून आपण काय बोध घेतला पाहिजे याचे सुरेख वर्णन केले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील राहुरी, पुणे, धुळे व कोल्हापूर या चार ठिकाणी कृषि उद्योजकता मंचाची स्थापना करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी कृषि उद्योजक श्री. साहेबराव नवले, श्रीमती श्वेता काकडे, सरकारसाहेब रावळ व अंकुश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ॲग्रीप्लास्टचे कार्यकारी संचालक राजीव कुमार रॉय यांनी सहाय्य केलेल्या ॲग्रीप्लास्ट स्कॉलरशीपचे तसेच एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 सोविनीअरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पाचा आढावा तसेच एमपीकेव्ही क्लायमेक्स-2022 या कार्यक्रमात आयोजीत उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर सूत्रसंचालन कु. सायली बिरादार हिने केले.
सकाळच्या सत्रात विद्यार्थीनी वसतीगृहाचे उद्घाटन डॉ. अग्रवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांनी कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करुन कृषि पदवीधर उद्योजकांच्या उत्पादनांची माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी कृषिभूषण सुरसिंग पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर व्हॅल्यु चेन-शेतकरी उत्पादक कंपन्या, बियाणे प्रक्रिया व लागवडीची रोपे या विषयावरील तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button