अहमदनगर

राहुरी येथील कृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य-2022 हा 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. 5 ते 9 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, दि. 5 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वा महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. अब्दुल सत्तार हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमात चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे, कार्यकारी परिषद सदस्य आ. नरेंद्र दराडे, आ. किशोर दराडे, दत्तात्रय उगले, तुषार पवार, दत्तात्रय पानसरे, गणेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
या युवक महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील 22 विद्यापीठांमधील 1100 विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. यामध्ये 30 वेगवेगळ्या इव्हेंटचा समावेश असून या कार्यक्रमाचा समारोप बुधवार दि. 9 नोव्हेंबर, 2022 रोजी होणार असून सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदिय कार्यमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व कृषि मंत्री व प्रतिकुलपती ना. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य इतर विद्यापीठातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.

Related Articles

Back to top button