कृषी

सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळेल- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील; इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा समारोप जल्लोषात संपन्न

राहुरी विद्यापीठ : जीवनात चढ उतार येत असतात पण प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. यशाने कधीही हुरळुन जाऊ नये व अपशय आले तर मनाने खचुन जाऊ नये असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य-2022 हा 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. 5 ते 9 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश शिंदे, प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कुलगुरु डॉ. व्ही.एन. मगरे, इंद्रधनुष्य 2022 चे समन्वयक व माजी राज्यसंपर्क अधिकारी डॉ. प्रमोद पाब्रेकर, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. दिलीप पवार, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. अतुल अत्रे, राजभवनातील डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. वानी लातुरकर, डॉ. विठ्ठलराव नाईक व डॉ. चितोडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की, हा इंद्रधनुष्य कार्यक्रम राज्यपालांनी आमच्यावर विश्वास ठेवून आयोजनाचा मान आमच्या विद्यापीठाला दिला. हा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आमच्या सर्व अधिकार्यांनी तसेच कर्मचार्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून हे इंद्रधनुष्य पेलण्याचे काम केले आहे. डॉ. संजय सावंत यावेळी म्हणाले की इंद्रधनुष्य यासारख्या कार्यक्रमांमधूनच अनेक कलाकार आपल्याला मिळाले आहेत. तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे ते ओळखून तुम्ही तुमचे भविष्य घडवले पाहिजे. तुमच्यातील कलागुण ओळखुन त्यातुन तुमची कारकिर्द घडवू शकता.
गणेश शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, श्रीकृष्ण व त्याचे जीवन आपण समजून घेतले पाहिजे. श्रीकृष्ण आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कधीही निराश झाला नाही. त्याने त्याच्या जगण्याचा उत्सव केला. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनाचा उत्सव करा. मस्त जगा, आनंदात जगा. आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतः कष्ट करून नोकरीच्या पाठीमागे न लागता उद्योगांमध्ये स्वतःचे भविष्य घडवता आले पाहिजे. आपली तसेच समाजाची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. उद्योग असेल, व्यवसाय असेल, कुठलाही व्यापार असेल यामध्ये आपले स्वप्न पहा असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू डॉ. व्ही.एन. मगरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यामध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. तर सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकविला. गोल्डन बॉयचा पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या अथर्व ओंकार वैराटकर याने तर गोल्डन गर्लचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाची रिया धनंजय मोरे हिने पटकविला. यावेळी मुख्ये पाच प्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. यामध्ये संगीत प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद सावित्रिबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी पटकविले तर नृत्य, वाड्मयीन कलाप्रकार, रंगमंचीय कला, ललीतकला या प्रकारात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. याप्रसंगी 29 कला प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी इंद्रधनुष्य-2022 या स्पर्धेबद्दल तसेच स्पर्धेतील विविध घटक तसेच परीक्षक, सहभागी विद्यापीठे, सहभागी विद्यार्थी याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात कुणाल बेंद्रे, किमया रणदिवे या विद्यार्थीनी तसेच कोल्हापूर येथील क्षितिजा ताशी, अकोला येथील डॉ. वृषाली देशमुख, जळगांव येथील डॉ. विजय लोहार व मुंबईचे डॉ. सुनील पाटील या संघ व्यवस्थापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी कवितेच्या स्वरुपात आभार मानले. सूत्रसंचालन सौ. विणा दिघे यांनी केले. बक्षिस वितरणाचे वाचन डॉ. वानी लातुरकर आणि डॉ. अतुल अत्रे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले कृषि विद्यापीठ गीताने झाली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Articles

Back to top button