कृषी

राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्थेचे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय मृद विज्ञान संस्थेचे 86 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर, 2022 दरम्यान, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसुल व पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सचिव (कृषि संशोधन आणि विस्तार विभाग, भारत सरकार) तसेच महासंचालक, भा.कृ.अ.प., नवी दिल्ली डॉ. हिमांशू पाठक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच डॉ. सुरेशकुमार चौधरी, उपमहासंचालक (नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन), भा.कृ.अ.प., नवी दिल्ली हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु मा. डॉ. पी.जी. पाटील हे भुषविणार आहेत.
दिनांक 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान चालणार्या या अधिवेशनास भारतातील सर्व मृदशास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात पीक उत्पादनात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन या जमिनीची आरोग्याबाबत, जमिनीच्या सुपिकतेबाबत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पर्यावरण व जैवविविधता तसेच शेतकर्यांना शेती करताना येणार्या समस्या व त्यावरील नियोजन या विषयावर परिसंवादाचे व स्मृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सधन शेतीत, रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे, तसेच तदनुषंगिक कारणामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी माती परिक्षण आधारीत खतांच्या परिणामकारक वापरास महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी शेतीबाबत पर्यायाने मातीच्या आरोग्याबाबत शेतकर्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने दिनांक 16 नोव्हेंबर, 2022 रोजी शेतकर्यांसाठी ‘शाश्वत शेतीसाठी मृदव्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजन समितीचे सचिव डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नवी दिल्ली येथील भारतीय मृदा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी.आर. बिश्वास आणि संस्थेचे सचिव डॉ. के.के. बंडोपाध्याय हे उपस्थित राहणार आहे. हा सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या नियोजन करण्यासाठी मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे, अध्यक्ष, राहुरी चॅप्टर यांचेसह सहसेक्रेटरी डॉ. रितू ठाकरे व कोषाध्यक्ष डॉ. श्रीगणेश शेळके प्रयत्न करत आहेत.

Related Articles

Back to top button