अहमदनगर

नगर- मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेचे आज तीन बळी; ५ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश

बाळकृष्ण भोसले | राहुरी : अहमदनगर- मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेचे आज तीन बळी गेले. जिल्ह्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले व राज्याला नेहमी दिशा देणारे मुत्सद्दी राजकारणी असताना व शिर्डी – शिंगणापूर या आंतरराष्ट्रीय देवस्थानाला जोडणारा हा प्रमुख महामार्ग आणखी कीती बळी घेणार हे नेहमीच प्रश्नांकीत राहिले नि राहणार आहे.
अपघाताविषयी समजलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या वेळी दुचाकीवरून शिर्डीकडून अहमदनगरकडे जाताना राहुरी सूतगिरणी परिसरात एकेरी केलेल्या मार्गावरून जात असताना समोर आलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी व समोरून आलेल्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या  अपघातात दुचाकी चालवत असलेला शुभम प्रकाश ठोकळ वय २५, प्रकाश मोहन ठोकळ वय ७१ या बापलेकांसह नातू  सायरस प्रविण जाधव वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लष्करी सेवेतून निवृत्त झालेले प्रकाश ठोकळ आपल्या मुलीला भेटण्यासाठी शिर्डी येथे गेले होते. परततांना मुलीचा सायरस नावाचा चिमुरडा नातु आजीला भेटण्यासाठी आग्रह धरत असल्याने बरोबर घेतला होता. रस्त्याचचं हा भीषण अपघात घडला.

आज राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी गायरान जमीन अतिक्रमण प्रश्नी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता सदरच्या मोर्चावरून परतताना पत्रकारांनी अपघातग्रस्तांना मदत केली. राहुरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

नगर-मनमाड महामार्ग धोक्याची पातळी ओलांडून बाहेर गेला आहे दररोज अपघात हा नित्याचाच दिनक्रम झाला आहे मागील महिन्यात १० वर बळी नि २५ हून अधिक हातपाय गमावून बसलेत आम्ही फक्त दवाखानाच करायचा का? शासन याच उत्तर केंव्हा देईल.
_ गणेश हारदे, सरपंच चिंचोली

Related Articles

Back to top button