कृषी

फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला ॲप्लिकेशन शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी विद्यापीठ : पीक उत्पादनामध्ये जमीन हा एक महत्वपूर्ण घटक असून जमिनीचे आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी शेतकर्यास मार्गदर्शन करावे. सदर ॲप्लिकेशन शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामधील दरी कमी करून शेतकर्यांना निश्चितच मार्गदर्शन करणाारे ठरेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
फुले बळीराजा या डिजिटल कृषि सल्ला ॲप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. जर्मन शासन बी. एम. झेड. व जी. आय. झेड., नाबार्ड, राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैद्राबाद, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे फुले बळीराजा या डिजिटल कृषि सल्ला ॲप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी डॉ. रसाळ बोलत होते. यावेळी नाबार्डचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक डॉ. जी.एस. रावत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, हैद्राबाद मॅनेजचे महासंचालक डॉ. भास्कर, प्रो-सॉईल प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, जी. आय. झेड. पुणेचे विभागीय व्यवस्थापक श्री. रणजीत जाधव व पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री पवार उपस्थित होते.
डॉ. रसाळ पुढे म्हणाले की बी.एम. झेड., जी. आय. झेड. आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने सदर प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठात सन 2017-18 पासून सुरु आहे. जमीन व हवामान यात सुसंगतता साधून पिकाचे नियोजन करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा उपयोग होणार आहे. डॉ. नरुटे आपल्या भाषणात म्हणाले की, हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकर्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी सर्व जिल्हा विस्तार केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, शेतकरी शात्रज्ञ मंच तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभवाअंतर्गत असलेल्या कृषिदूत यांच्यामार्फत हा प्रकल्प शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. डॉ. भास्कर यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विज्ञान केंद्रांचे विशेषज्ञ यांना प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर श्रीमती भाग्यश्री पवार यांनी जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेतकर्यांनी करावयाच्या उपाययोजना विषद केल्या.
डॉ. गोरंटीवार यांनी हा प्रकल्प प्रथमदर्शनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात व त्यानंतर सर्व गावांमध्ये सुरु होईल, असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. जी.एस. रावत यांनी पीक उत्पादनाबरोबर काढणी पश्च्यात तंत्रज्ञानावर भर देऊन व्यवस्थापन साखळी विकसित करण्याची गरज व्यक्त केली. शेतकरी उत्पादक कंपनी यांना जास्त वाव असून त्यांनी शेतकर्यांची आर्थिक बाब समजून घेणे गरजेचे आहे. तसेच चांगले संघटन, चांगले उत्पादन, कमी भांडवलावर चांगला परतावा मिळवण्यासाठी त्यांनी भर दयावा असे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. मुकुंद शिंदे यांनी फुले बळीराजा या डिजिटल कृषि सल्ला ॲप्लिकेशनच्या वापरासंबंधी सादरीकरण केले. पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी, कास्ट-कासम प्रकल्पाअंतर्गत माती व्यवस्थापन संदर्भातील विविध अभ्यासक्रम, माती व्यवस्थापन सारग्रंथ, अल्प मुदत प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादींचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्त्रज्ञ, अशासकीय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र यादव यांनी मानले.

Related Articles

Back to top button