अहमदनगर

चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या उंबरठ्यावर, सरपंच उपसरपंचाच्या विकास कामांना प्लस की मायनस?

बाळकृष्ण भोसले | राहुरी : तालुक्यातील नेहमीच योग्यतेच्या दृष्टीने चर्चेत राहिलेल्या चिंचोली ग्रामपंचायतीचा बिगुल येत्या महिनाभरात वाजणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पदाधिकारी निश्चितीची प्रक्रिया पुर्ण होणे आवश्यक आहे. मात्र वार्ड पुनर्रचना, मतदार यादीची प्रसिध्दी याला वेळ लागणार असल्याने ही निवडणूक जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारी मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील तिसरा ग्रा. पं. निवडणुकांचा टप्पा घोषित होईल तसे गावात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील उत्तरेला राहाता व राहुरी तालुक्याच्या सरहद्दीवर व पद्मश्री विखे पा. व डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना या दोन्हीच्या काॅमन झोनमधील कोल्हार खुर्द नंतरचं प्रमुख गावं, गावाच्या उत्तरेकडून शेतमळ्यासह पशुपक्ष्यांची तहान भागविणारी मुख्य असलेली जीवनवाहीनी प्रवरामाई भरभरून वाहते. याच नदिवरच्या भंडारदरा व निळवंडे धरणातून पहिली राहुरी मतदार संघात असलेली पणं आता पुनर्रचित मतदार संघाच्या रचनेत श्रीरामपूर मतदार संघात गेलेली प्रवरेकाठची ३२ गावांची मानवासह शेतीची गरज भागविली जाते.
एकुणच चिंचोली गावं तसं पुर्वापारपासून सुजलाम होतचं काळाच्या ओघात पाणी कमी होत गेलं. जमीनीची सुपीकता कमी होत गेली. वारंवारच्या पीकपध्दतीने उत्पादन क्षमता घटली वरून लोकसंख्या वाढीचा फटका हेक्टरवरून एकर ते गुंठ्यापर्यंत आली. नजीकच्या काळात तो स्क्वेअर वर गेल्यास आश्चर्य वाटायला नको. तर चिंचोलीचं हे अंतर्गत व बाह्यरूप नेहमीच अबालवृध्दांचं आकर्षण राहिलं आहे नाही म्हणायला जुनी पिढी गावं पुढे न्यायला कधी मागे राहिली नाही. मग त्यात पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पा. तर डाॅ. बाबुराव दादा तनपुरे व मा. खा. प्रसाद तनपुरेंचे गटतट गावात असतानाही गावविकासात दोन्ही गट नेहमीच एकत्र राहिल्याचा इतिहास सांगतो. परंतू प्रवरेच्या पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं.
सहकारी संस्थेकडे असलेला नावाजलेला खत डेपो बंद पडला ज्या योगे विकास धावतो तो पदपथ थांबल्याने त्यावरूनची विकासात्मक रहदारी ओघाने थांबते व त्याचा परिणाम त्या संस्थेच्या एकुणच तब्बेतीवर होतो. पर्यायाने सभासदांचा नफा कमी होवून संस्थाही डबघाईस येते. तर ग्रामपंचायतीला घर व पाणीपट्टी कराबरोबरच व्यावसायिक व शेतीच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत विकासकामांसाठी गतकाळात नेहमीच प्रयत्न झाले. लोकसंख्या वाढत गेल्याने गरजा वाढल्या व आहे त्या जलवाहीन्या कमी पडल्याने नवनवीन योजना राबवल्या गेल्या. सध्याचे लोकनियुक्त सरपंच गणेश हारदे व शेवटच्या वर्षात उपसरपंच पदाची संधी मिळालेले विलास लाटे यांचे विकासात्मक पाऊल निश्चितपणे वाखाणण्याजोगे राहिले.
वाड्या वस्त्या, शिव, व पाणंद रस्त्यांची या जोडगोळीने केलेली कामे ग्रामीण विकासात मैलाचा दगड ठरली असे म्हणणे वावगे होणार नाही. १४ वा १५ वा वित्त आयोग, जिल्हा परिषदेचा सेस फंड, आमदार व खासदार निधी, तसेच दलित वस्ती सुधार योजनेतून पक्के रस्ते हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला बरोबरच कोरोना काळातील हारदे यांचे योगदान कायम स्मरणात राहिलं असेच म्हणता येईल. कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयावह व चिंचोलीतील महिनाभराच्या कालावधीत जवळपास २५-३० जणांना घेवून गेली. त्यावेळी दवाखान्यापासून घरच्यांना आधार देण्यात श्री हारदे अग्रसर होते. नाही म्हणायला काही उणीवा ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळी कडून राहिल्यात त्याचा फायदा तोटा आगामी काळात दिसेलच.
जलजीवन मिशन वादात ?
     चिंचोली व कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास १० कोटींचा निधी मिळाला असून त्या कामाच्या निवीदा निघून काम सुरू करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. चिंचोलीत त्यानुषंगाने ठेकेदाराने पाईपलाईनची कामे सुरु केली आहेत तर या योजनेचा फेर आराखडा करण्याची मागणी कोल्हार खुर्द ग्रामस्थांनी करत तीव्र विरोध दर्शविला आहे. गटविकास अधिकारी यांनी या ग्रामस्थांची भेट घेत सकारात्मक चर्चा करत मागणी मान्य केली आहे. या योजनेचा आराखडा करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेत उणीवा दूर करता आल्या असत्या. परंतू तसे झाले नसल्याचे जनतेचे मत आहे तर मुळ ठेकेदाराने पदरमोड करत आराखडा बनवला.
मात्र ऐनवेळी सदरचे काम वेगळ्याच ठेकेदाराला दिले गेल्याच्या तक्रारीही आहेत तर पंचायत समिती, जि. प. निवडणूका पुढे ढकलल्याने पदाधिकारी नसल्याने प्रशासन व संबंधित ठेकेदार हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. पाणीसाठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र, पाणीसाठवण टाक्या आदी मोठी योजना तसेच आगामी ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून योजना आणली गेली असल्याने ग्रामस्थही लक्ष देत आहेत हे सजग गावचे लक्षण म्हणावे लागेल. एकुणच येवू घातलेल्या निवडणूकीत प्लस की मायनस याचा कौल जनतेतून मिळणार असल्याने सध्यातरी निवडणूकीचे वारे वाहण्यास मात्र सुरूवात झाली हे तितकेच खरे…

Related Articles

Back to top button