अहमदनगर

कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शरद गडाख यांचा सत्कार समारंभ संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संशोधन व विस्तार शिक्षण या पदावर कार्यरत असणारे डॉ. शरद गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच निवड झाली. कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे व निम्नस्तर कृषी शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की डॉ. शरद गडाख यांनी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक पदावर काम करताना विद्यापीठाला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांचा वक्तशीरपणा, कामाचे नियोजन, प्रचंड व निरंतर मेहनतीची तयारी यासारख्या चॅम्पियन बनवणाऱ्या गुणांनीच त्यांना कुलगुरूपदी पोहोचविले. 
सत्काराला उत्तर देताना डॉ. शरद गडाख म्हणाले की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यापासून विविध पदांवर काम करता आले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. राहुरी विद्यापीठाचे वर्क कल्चर खूप चांगले असून ५०% पर्यंत व्हेकन्सी असताना सुद्धा प्रत्येकाने दोन दोन पदांचा कार्यभार सांभाळताना चांगले काम केले. विद्यापीठ रँकिंग मध्ये 34 स्थानावरून 24 व्या स्थानी येण्यामध्ये या सर्वांची योगदान आहे. विद्यापीठात काम करताना 21 वाण विकसित केले. होप सारख्या प्रकल्पामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली. 25 ते 30 हजार क्विंटल बियाणे निर्मितीची क्षमता वाढविली. सध्या विद्यापीठात 32 डेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केले असून त्यामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडून महसुली उत्पन्न वाढीचे 100 कोटीचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होणार आहे. या विद्यापीठातील 38 वर्षांच्या अनुभवाची शिदोरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उपयोगी येणार आहे. आपला विद्यार्थी उद्योजक म्हणून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा कसा होईल हा उद्देश समोर ठेवून यापुढे काम करणार आहे. ज्या ठिकाणी संधी मिळेल तेथे आपला कामाचा ठसा उमटवा, हातचा राखून काम करू नका असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी विद्यापीठ, विद्यार्थी व समन्वय संघाच्या वतीने डॉ. शरद गडाख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रमोद रसाळ, प्रमोद लहाळे, डॉ. बापूसाहेब भाकरे, मिलिंद डोके, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. सी. एस. पाटील व डॉ. विजू अमोलिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.

Related Articles

Back to top button