कृषी

जाणुन घेऊयात कोण आहेत ऑगस्ट महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे.
यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भाग या ठिकाणी लावण्यात येतो. तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो. जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.
ऑगस्ट 2022 या महिन्याकरीता शेतकरी आयडॉल म्हणुन मु.पो. म्हसवे, ता.जि. सातारा येथील सचिन शेलार व कृषि उद्योजक म्हणुन कोल्हापूर कृषि महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषि) चे शिक्षण घेतलेले पुणे येथील हेमंत कळमकर यांचा समावेश आहे. सचिन शेलार हे जरबेरा, निशिगंध, डच गुलाब, ग्लॅडीएटर, सुगंधी पाकळीसाठीचा गुलाब इ. फुलांची हायटेक शेती करीत आहेत. त्यांनी म्हसवे ॲग्रीव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गुलाब प्रक्रिया करुन गुलकंद, गुलाबजल, गुलाब सिरफ आणि गुलाब पाकळी तसेच उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, पापडाचे 13 प्रकार इ. तयार करुन कंपनीच्या माध्यमातून ॲग्री मधुर नावाचा ब्रॅंड विकसीत केला आहे. कृषि उद्योजक असलेले श्री. कळमकर यांनी ॲगझॉन ग्रुपच्या माध्यमातून 400 पेक्षा जास्त व्यवसाय भागिदारांच्या मजबुत नेटवर्कमुळे दर्जेदार प्रॉडक्टस् जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचवले आहेत. तसेच त्यांच्या ॲगझॉन ॲग्रीटेक या कंपनीच्या माध्यमातून पुरवठा साखळीचे प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातात. यामुळे पुरवठा साखळीमधील असंख्य मध्यस्त टाळले जावून ग्राहकांना योग्य किंमतीला ताजी फळे आणि भाज्या उपलब्ध होतात.

Related Articles

Back to top button