कृषी

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्ननिर्मिती शक्य – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

कृषि विज्ञान केंद्रासाठी नैसर्गिक शेतीवरील कार्यशाळा संपन्न…

राहुरी विद्यापीठ : नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना विषमुक्त अन्न निर्माण करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. तसेच ते पुढे म्हणाले हरितक्रांतीमुळे भारतीय कृषि उत्पादनात अमुलाग्र क्रांती झाली आहे. सद्यस्थितीत शेती क्षेत्रासमोर सुरक्षीत अन्न निर्मिती करण्याचे महत्वाचे लक्ष आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वतीने कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 17 कृषि विज्ञान केंद्रांची एक दिवसीय नैसर्गिक शेती ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.
याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, कृषि परिषदेचे संचालक विस्तार डॉ. विठ्ठल शिर्के ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी डॉ. लाखन सिंग म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठातंर्गत आयोजीत नैसर्गिक शेती कार्यशाळेमुळे कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकर्यांमध्ये या विषयावर जनजागृती करणे शक्य होईल. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी नैसर्गिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेती, योगिक शेती, झिरो बजेट शेती या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण 17 कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक उपस्थित होते. या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती या विषयावर अक्षय कृषि परिवार, कच्छ गुजरातचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, मंडळ कृषि अधिकारी उमेश भदाने, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, कोल्हापूर कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. रविद्र सिंग, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषि विद्यापीठातील डॉ. नामदेव म्हसकर आणि नंदुरबार कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. राजेंद्र दहातोंडे यांनी उपस्थितांना नैसर्गिक शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. भगवान देशमुख यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button