कृषी

सोयाबीन पिकावरील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकावरील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन
डॉ. टी.के.नरुटे, डॉ. एस.व्ही.कोळसे, डॉ.एस.आर. झांजरे, डॉ. व्ही.के. भालेराव, डॉ. नारायण मुसमाडे
वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी
———————————-

सोयाबीन हे भारतातील महत्वाचे पीक आहे. जगातील सोयाबीनच्या एकुण क्षेञापैकी जवळजवळ 12 टक्के क्षेञ भारतात आहे. महाराष्ट्रात चालू हंगामामध्ये विविध विभागामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाटयाने वाढ झाली आहे. भारतामध्ये सोयाबीन या पिकाखालील क्षेञ 10.15 मिलियन हेक्टर तर महाराष्ट्रात 40 लाख हेक्टर आहे. ऊस या नगदी पिकास चांगला पर्याय म्हणून पुढे आलेल्या या पिकास शेतक-याकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. सोयाबीन हे एक सकस पीक असून त्यात 40 टक्के प्रथिने आणि 20 टक्के तेलाचे प्रमाण असते. कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणा-या या पिकावर सध्या हवामानातील बदल तसेच पावसाची अनियमितता यामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. चालू हंगामात सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने महाराष्ट्रातील काही भागात आढळून येत आहे. सोयाबीन या पिकावर जवळपास डझनभर विषाणूजन्य रोगांचा प्रादर्भाव होत असल्याचे आढळून येतात. त्यापैकी सोयाबीन मोझॅक आणि पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून येतो. सदर लेखामध्ये आपण सोयाबीन पिकावर येणा-या विषाणूजन्य तसेच इतर महत्वाच्या रोगांची ओळख, लक्षणे आणि व्यवस्थापनाची काळजी कशी घ्यावी याबाबत तांञिक माहिती-
सोयाबीनवरील महत्त्वाचे रोग :-
1. मोझॅक :-
सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्यरोग असून तो सोयाबीन मोझॅक वहायरस नावाच्या विषाणूमुळे होतो.
लक्षणे व परिणाम :
रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळया पडतात तसेच फिक्कट हिरवे व पिवळसर हिरवे रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्ट होतात व झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकतलेले असते व त्याची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे 300से. पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात. 
रोगाचा प्रसार : या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे तसेच बियाणेव्दारे होतो.
रोग व्यवस्थापन :-
1) विषाणूविरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
2) रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
3) विषाणूजन्य रोग प्रभावित क्षेञातील सोयाबीन बियाण्यासाठी वापरु नये.
4) या विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे होत असल्याने मावा या किडीच्या नियंञणासाठी मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकाची 15 मि.ली. 10 लि. पाण्यात किंवा इमिडाक्लोरोपिड 17.8 टक्के एस.एल. या किटकनाशकाची 4 मि.ली. प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
2. पिवळा मोझॅक :
पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य सोयाबीन पिकावर रोग असून तो मुगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो.
रोगाचा प्रसार :- या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किटकाव्दारे होतो.
लक्षणे व परिणाम-
रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंडयाकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पुर्णपणे खुंटते. पाने सुरकतून जातात फुलांची व शेंगाची संख्या देखील कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर रोगाचा विपरीत परिणाम होतो. या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किटकाव्दारे होतो.
रोग व्यवस्थापन :-
1. या रोगाचा प्रसार पांढ-या माशीव्दारे होतो. त्यामुळे पांढ-या माशीच्या नियंञणासाठी आंतरप्रवाही किटकनाशकांचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मिथील डेमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
3. सोयाबीन पिकात आंतरपीक व मिश्र पीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.
4. पिवळे चिकटे सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी 10 ते 12 या प्रमाणे लावावेत. 
3. तांबेरा 
तांबेरा हा रोग फॅकोस्पोरा पॅचीरायझी या बुरशीमुळे होतो.
लक्षणे व परिणाम :
सुरुवातीस रोगाचा प्रादुर्भाव जमिनी लगतच्या पानांवर आढळून येतो. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानाच्या खालील पृष्ठभागावर मुख्यशिरेजवळ लहान आकाराचे पिवळसर तांबूस रंगाचे ठिपके जास्त प्रमाणात दिसतात. रोगाची तिव्रता वाढली की पुटकुळया / ठिपके पानाच्या दोन्ही बाजूस तसेच पानाचे देठ, कोवळेखोड, फांदयायांवरसुध्दा आढळून येतात. या ठिपक्यांमध्ये तांबूस-तपकिरी रंगाची पावडर तयार होते. स्पर्श केल्यास हाताला लागते. ही पावडर म्हणजेच तांबे-याच्या बुरशीचे बीजाणू होत. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांची पाने लवकर गळतात. त्यामुळे शेंगेत दाणे भरले जात नाहीत अथवा बारिक, रोगट व सुरकुटलेले दाणे तयार होतात परिणामी उत्पादनात मोठया प्रमाणात घट येते.
रोग व्यवस्थापन :-
1) तांबेरा रोगाच्या नियंत्रणसाठी रोगप्रतिबंधक जातींची लागवड हा एकच खात्रीशीर उपाय आहे. फुले कल्याणी (डी. एस. 228), पी.के.472, एम.ए.एस.58,एम.ए.सी.एस.58, एम.ए.सी.एस. 324, तसेच अंकुर, इंदिरा इ. मध्यम/कमी बळी पडणा-या रोगप्रतिबंधक जातींची निवड करावी.
2) या भागामध्ये पाण्याची सोय आहे तेथे सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान करावी म्हणजे हे पीक तांबेरा येण्याच्या वेळेपर्यंत पक्व होते. त्यामुळे तांबेरा रोगापासून होणारे नुकसान टाळता येते.
3) या रोगाच्या बुरशीला जीवंत राहणेसाठी वर्षभर सोयाबीन पिकाची आवश्यकता असते. म्हणून फक्त खरीप हंगामातच या पिकाची लागवड करावी. हे पीक चांगले आंतर पिक म्हणून उपयुक्त असले तरी रब्बीव उन्हाळी हंगामातच पीक घेऊ नये.
4) पेरणीनंतर 35 दिवसांनी पिकावर मॅन्कोझेब 25 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
5) प्रभावी नियंत्रणाकरिता रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर 15 दिवसाचे अंतराने डायफेनकोनॅझोल (स्कोर)0.1 टक्के (10 मि.ली.) किंवा प्रापीकोनॅझोल (टिलट) 0.05 टक्के (5 मि.ली.) 10 लिटर पाण्यात मिसळून तीन (45, 65 व 75 दिवसानंतर) फवारण्या कराव्यात.
4. पानावरील जिवाणूचे ठिपके :-
हा रोग सिडोमोनास सिरिंजी पीव्ही ग्ल्यायसिनिया या जिवाणूमुळे होतो.
लक्षणे व परिणाम :
झाडाच्या पानांवर व शेंगावर त्रिकोणी, चौकोनी आकाराचे तपकिरी करडया रंगाचे ठिपके दिसून येतात. ठिपक्या भोवती पिवळसर वलय दिसते. ठिपक्यांचे प्रमाण जास्त असलयास पाने गळून पडतात. आर्द्र हवामानात रोग झपाटयाने वाढतो.
रोग व्यवस्थापन :-
पिकावर 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड + 1 ग्रॅम स्ट्रेटोसायक्लीन 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारावे. आवश्यकतेनुसार 15 दिवसाचे अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
5.मूळ आणि खोडकुज:-
 मूळ आणि खोडकुज हा रोग प्रामुख्याने मॅक्रोफोमिणा फॅसिओलिना या बुरशीमुळे होतो.
लक्षणे व परिणाम :
रोपावस्थेत रोगाची लागण जास्त दिसून येते. रोगाची लागण जमिनीलगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त झालयामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. अशी रोपे मरतात आणि जमिनीलगतच कोलमडतात. रोगट खोडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे (स्कलेरोशिया) दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस रोगाच्या प्रसाराला पोषक ठरते.
रोग व्यवस्थापन :-
1. पेरणीपूर्वी 1 किलो बियाण्याला 3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा 2 ग्रॅम थायरम + 1 ग्रॅम कार्बेन्डाझीम लावावे.
2. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
3. जमिनीत निंबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रिय खते टाकावीत.
6. बुंधाकुज (कॉलररॉट ):- 
 बुंधाकुज हा रोग स्क्लेरोशियम रोल्पसी या बुरशीमुळे होतो.
लक्षणे व परिणाम :
झाडाचे मुळ व खोड यांच्या जोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. तसेच बुरशी बीजेही आढळून येतात. पुढे झाडाच्या या भागाची सड होते. झाड सुकते व मरुन जाते. पण मोठया अवस्थेत झाड पिवळे पडते व नंतर मरते.
रोग व्यवस्थापन :-
1. पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरमकिंवा कॅप्टन किंवा 2 ग्रॅम थायरम + 1 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाणेप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
2. लागण झालेली झाडे उपटून काढावीत व शेतावर नेऊन जाळावीत.

7. करपा अथवा अॅन्थ्रॅकनोज : कोलेटोट्रिकम ट्रंकॅटम

लक्षणे :- 

रोगग्रस्त झाडाची पाने गुडांळतात, देठ वाळतात, अर्धपक्व पाने गळतात, उगवणीनंतर तसेच चांगली वाढ झाल्यानंतरही झाडे कोलमडतात, पानांवर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात, बुंधा काळा पडतो. शेंगा करपतात आणि काळया पडतात. या रोगास 20 ते 35 अंश.सेल्सीअस तापमान या रोगाच्या वाढीसाठी पोषक आहे. 100 टक्के आर्द्रता असताना शेंगावर या रोगाची वाढ चांगली होते. 
रोग व्यवस्थापन :-
1. निरोगी बियाण्याचा वापर करावा. 
2. जमीनीची खोल नांगरट करुन धसकटे वेचावीत. 
3. पेरणीपूर्वी बियाणास थायरम 4 ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया करावी. 
4. शेंगाच्या वाढीच्या काळात पिकावर मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 3 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 8. बियाणावरील जांभळे डाग : सरकोस्पोरा किकुची 
लक्षणे :  
अनियमित आकाराचे जांभळे किवा गडद जांभळे डाग बियाणावर दिसतात. ब-याच वेळा संपूर्ण बी जांभळया रंगाच्या डागाने व्यापले जाते.रोगग्रस्त बियाणापासून निर्माण होणारी रोपे कोमजतात व नाश पावतात. 
रोगग्रस्त शेंगावर जांभळे डाग दिसतात व शेंगा लवकर पक्व होतात; परंतु त्यामध्ये असणारे बी मात्र आकाराने लहान राहते, त्यामुळे उत्पादनात घट येते. पीक फुलो-यात असताना या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. या रोगास उष्ण आणि जास्त आर्द्रता असणारे वातावरण तसेच 20 -27 अंश सेल्सीअस तापमान या रोगाच्या वाढीस पोषक आहे. 
रोग व्यवस्थापन :-
1. पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे. 
2. शेताची खोल नांगरट करुन धसकटे वेचून घ्यावीत. 
3. पेरणीपूर्वी बियाणास थायरम या बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. 
4. बेनोमिल या बुरशीनाशकाची 5 ग्रॅम /लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 25 दिवसांनी व नंतर 30 दिवसांनी फवारणी केल्यास प्रभावी रोग नियंत्रण होते. 
5. मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची 25 ग्रॅम /100 लीटर पाण्यात मिसळून 12-15 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस फवारल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळते. 

9. चारकोल रॉट :मॅक्रोफोमिना फॅजिओलिना 
लक्षणे : रोगग्रस्त रोपे उगवल्या भागाजवळ रंगविरहित होतात. शेंगा व बीयाण्यावर काळसर रंगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
अनियमित काळसर रंगाच्या स्क्लेरोशिया रोगग्रस्त झाडाच्या मुळाच्या पृष्ठभागावर आणि मूळातील उतीमध्ये दिसतात. या स्क्लेरोशिया कोळसा पावडरसारख्या असतात. त्यामुळे या रोगास ‘चारकोल रॉट‘ किंवा ‘चारकोळ कुज‘ म्हणतात. 
रोग व्यवस्थापन :-
1) उन्हाळयात जमीनीची खोल नांगरट करावी. 
2) पिकांची फेरपालट करावी. 
3) बियाणास थायरम 4 ग्रॅम प्रती किलो किंवा थायरम अधिक कार्बेन्डेझिम 3 ग्रॅम प्रती किलो बियाणे या बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

Related Articles

Back to top button