कृषी

आधुनिक शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञान विकसीत करणे ही काळाची गरज- प्रभाकर चांदणे

अहमदनगर/ जावेद शेख : डिजीटल शेतीमध्ये शेतीला अधिक उत्पादनक्षम, अधिक सातत्यपूर्ण वेळ आणि संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याची क्षमता आहे. तसेच आधुनिक शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञान विकसीत होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून विविध प्रयोगशाळांची पाहणी चांदणे यांनी केली, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे संचालक आनंदराव पाटील, महेंद्र बाजारे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. विक्रम कड उपस्थित होते.
डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी यावेळी प्रकल्पाविषयी माहिती देवून प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या विविध डिजीटल तंत्रज्ञानाची माहिती दिली. या भेटीदरम्यान कास्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन आणि रोबोटीक्स प्रयोगशाळेबद्दल माहिती डॉ. गिरीष भणगे व इंजि. योगेश दिघे यांनी दिली. ऑटो पी.आय.एस., स्मार्ट पी.आय.एस., स्वयंचलीत पंप प्रणाली आणि सेंसर आधारीत सिंचन प्रणालीबद्दल माहिती डॉ. प्रज्ञा जाधव, डॉ. अंजली मुसमाडे, डॉ. मंगल पाटील व इंजि. श्रध्दा वराळे यांनी दिली. कास्ट प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल प्रभाकर चांदणे यांनी विशेष गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली तर डॉ. शुभांगी घाडगे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button