शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयात ‘विद्यार्थी व संशोधकांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर आणि संशोधन साधने’ विषयी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात‘ विद्यार्थी व संशोधकांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर्स आणि संशोधन साधने’या विषयावर भौतिकशास्त्र व गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दूरदृश्य प्रणालीद्वारे यशस्वीरित्या संपन्न झाली.


कार्यशाळेच्या सुरुवातीला भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश कान्हे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर यांनी कार्यशाळेतील साधन व्यक्ती, सहभागी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. नितीनकुमार पाटील यांनी संशोधन करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सॉफ्टवेअर्स व संशोधन साधने यांची गरज व महत्त्व स्पष्ट केले.

सदर कार्यशाळेत अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. रविकिरण लाटे यांनी क्ष-किरण विवर्तन विश्लेषण या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या संगणकीय सादरीकरणात डॉ. लाटे यांनी क्ष-किरण सिद्धांत, पदार्थविज्ञान व सॉफ्टवेअर्स वापरून क्ष-किरण विवर्तन विश्लेषण करण्याची पद्धत विशद केली. राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरी येथील संख्याशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक शिवगाजे यांनी आपल्या संगणकीय सादरीकरणात संशोधनामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध संगणक प्रणाली व संख्याशास्त्र यांचे महत्त्व सुलभ पद्धतीने प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले.

अमरावती येथील गव्हर्मेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज संस्थेतील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अशोक नवले यांनी सादरीकरणामध्ये संशोधन, माहितीचे विश्लेषण व आलेख काढण्यासाठी वापरात येणाऱ्या ओरिजिन या संगणक प्रणालींची सोदाहरण प्रात्यक्षिकासह माहिती व आलेखांचे महत्व अधोरेखित केले. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहाता येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विक्रम भालेकर यांनी संशोधनासाठी लागणारे संदर्भ व्यवस्थापन, सॉफ्टवेअर्स या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी येथील गणित विभागाचे प्रा. प्रमोद मोमले यांनी मॅक्सीमा संगणक प्रणाली या विषयावर विद्यार्थी व संशोधकांसाठी प्रात्यक्षिक सादर केले. सात्रळ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. डॉ. विजय कडनोर यांनी आपल्या संगणकीय सादरीकरणामध्ये संशोधनासाठी उपयुक्त असणाऱ्या संगणक प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर केले. डॉ. कडनोर यांनी आपल्या सादरीकरणामध्ये गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी केम-ड्रॉ या संगणक प्रणालीचे महत्त्व विशद करत प्रात्यक्षिकासह संगणक प्रणाली समजून सांगितली.

सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. गोरक्षनाथ गोते यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. गोते यांनी आपल्या संगणकीय सादरीकरणामध्ये मानवीय डोळ्यांची मर्यादा व इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज प्रभावीपणे संशोधकांना समजावून सांगितली. बी. जे. एस. संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, जि. पुणे येथील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शिवाजी सोनवणे यांनी यूव्ही व्हीजीबल व एक्स पी एस एनालिसिस या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे तसेच प्रा. बाबासाहेब राजदेव, प्रा. माधुरी जेजुरकर यांनी परिश्रम घेतले. गणित विभाग प्रमुख प्रा. अश्विनी साळुंके यांनी साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप यांनी आभार प्रदर्शन केले. तर भौतिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व समन्वयक प्रा. निलेश कान्हे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Back to top button