ठळक बातम्या

महात्मा फुले कृषि विद्यापीठाची कुशल मनुष्यबळ निर्मितीमध्ये आघाडी

राहुरी विद्यापीठ/जावेद शेखसरदार वल्लभभाई पटेल सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार (2002), देशातील उत्कृष्ट संस्था म्हणुन 100 कोटी रुपयांचे विशेष पारितोषीक (2008), देशातील सर्वात पसंतीची संस्था (2009) यासारख्या पारितोषीकांनी गौरविल्या गेलेल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध विद्याशाखाच्या एकुण 1,15,349 स्नातकांच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली आहे. शेती, उद्योग आणि प्रशासकीय सेवेत विद्यापीठाचे पदवीधर कार्यरत आहेत. सन 1968 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे कार्य शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या तीन शाखांद्वारे चालते. सद्यस्थितीत या विद्यापीठांतर्गत 8 घटक आणि 64 संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच 9 घटक आणि 65 कृषि तंत्र विद्यालये, एक कृषि तंत्र निकेतन आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषि विषयक शिक्षण देण्यात येते. विद्यापीठांतर्गत कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विद्याशाखांतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. जैव तंत्रज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम आहे. पदव्युत्तर पदवीच्या 18 विषयात तर आचार्य (पीएच.डी.) पदवीच्या 17 विषयात अभ्यासक्रम राबविण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय सहयोग कार्यक्रमांतर्गत राहुरी कृषि विद्यापीठाने नेदरलँड येथील व्हॅन हॉल लॅरेनस्टीन विद्यापीठाबरोबर बी.एस्सी. (कृषि), बी.एस्सी. (पशुविज्ञान) आणि बी.बी.ए. (कृषि) विषयांबरोबरच कृषि व्यवसाय व्यवस्थापन प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारीत शिक्षण कार्यक्रम तसेच बॅकॉक येथील एशियन तंत्रज्ञान संस्थेबरोबर कृषि व्यवसाय व्यवस्थापन विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदवी, उद्यानविद्या विषयात कार्यानुभवावर आधारीत शिक्षण कार्यक्रमासंबंधी करार झालेला आहे. भा.कृ.अ.प., नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाचे अद्ययावत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (कास्ट-कासम) हा जागतीक बँकेच्या आर्थिक पाठबळाने चालविला जाणारा प्रतिष्ठीत असा प्रकल्प राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मिळाला आहे. या केंद्राद्वारे तयार करण्यात आलेल्या फुले रोबो फवारणी यंत्राला नवी दिल्लीत झालेल्या कृषि भारत हॅकथॉन-2020 या प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कास्ट-कासम प्रकल्पाद्वारे पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या एकुण 20 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी बॅकॉक, थायलंड येथील ड्रोनचे ॲप्लीकेशन आणि गुगल अर्थ इंजिन या प्रशिक्षणासाठी निवड झाली.

या विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांन राष्ट्रीय पातळीवरील जे.आर.एफ., एस.आर.एफ., नेट, गेट, कॅट, ए.आर.एस. या सारख्या परिक्षांमध्ये उल्लेखनीय कामगीरी केली आहे. अशा प्रकारे या विद्यापीठाने शिक्षण, संशोधन तसेच विस्तार क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. याबरोबरच या विद्यापीठातून पदव्या प्राप्त केलेल्या नव उद्योजकांनी स्वतःचा उद्योग उभारुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन विद्यापीठाच्या नावलौकीकात भरच टाकलेली आहे. अशा या विद्यापीठात गुरुवार (ता. 28) रोजीच्या पदवीदान समारंभाद्वारे विविध विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवी मिळुन 11 हजार 468 स्नातकांना कुलपतींद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

Related Articles

Back to top button