शिक्षणवारी ज्ञान पंढरी

लोकसाहित्य संकलन व संशोधन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया – मा. कुलगुरू डॉ. कोतापल्ले

चिचोंली/बाळकृष्ण भोसले : लोकसाहित्याचे अनुभवविश्व समृद्ध व व्यापक आहे. व्यक्ती, समाज, संस्कृती, अंतर्मन-बाह्यविश्व अशा अनेकविध आशयसूत्रांनी लोकसाहित्य बहरलेले आहे. लोकसाहित्य हा अखंड वाहणारा ज्ञानप्रवाह आहे. परंतु लोकसाहित्य संशोधन मंडळाचे काम आज ठप्प झाल्याचे दिसते. गावगाड्यातील संकलित माहितीद्वारे गावांचा इतिहास लिहिता येतो. आदिवासींकडे ज्ञान आहे, पण मान्यता कोणी देत नाही.राजसत्ता, ज्ञानसत्ता, धर्मसत्ता या आपल्याकडे एकच झाल्या आहेत. लोकसाहित्य संकलन व संशोधन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, असे मत प्रतिपादन चर्चासत्राचे बीजभाषक मा. कुलगुरू व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्न, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ ता. व आय.क्यू.ए.सी. अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने दूरदृश्यप्रणालीद्वारे एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. “लोकसाहित्य संशोधनातील वाटा आणि वळणे” या विषयावर आयोजित केलेल्या या चर्चासत्रात ६४८ संशोधक, अभ्यासकांनी सहभाग नोंदवला.

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर होत्या. याप्रसंगी गुलबर्गा येथील कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कलबुरगीच्या ‘माझी मराठी’ त्रैमासिक मुख्य संपादक मा. प्राचार्य प्रा. भालचंद्र शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप यांनी स्वागत केले. अतिथींचा परिचय उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप यांनी करून दिला. राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख व समन्वयक प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

चर्चासत्राचे ऑनलाइन उद्घाटन करून मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रो. डॉ. विश्वनाथ शिंदे म्हणाले, “कलांची निर्मिती करून त्यांचे जतन करणाऱ्या लोकांनाच लोक म्हटले पाहिजे. परंतु आपल्याकडील व्यवस्थेमध्ये कला मोठी पण जोपासणारा शुद्र मानला गेला. कलावंत म्हणून ही लोकं मोठीच आहेत. कलाकेंद्र चालवणारी राजकीय नेते मोठे झाले. परंतु कलावंतांचं होणारी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण मात्र उपेक्षितच राहिले. लोकसंस्कृतीचे उपासक म्हणून या लोककलावंतांचा केवळ भावनिक गौरव करण्यापेक्षा त्यांच्या जीवनकार्याचा सामाजिक, सांस्कृतिक सत्यशोध घेऊन त्यांना योग्य न्याय देणे आवश्यक आहे.

पहिल्या सत्रात मुंबई येथील पत्रकार आणि लेखक डॉ. मुकुंद कुळे यांनी साधन व्यक्ती म्हणून ‘लोकसाहित्य संशोधनाच्या नव्या दिशा’ या शीर्षकाच्या शोधनिबंधाचे वाचन केले. याप्रसंगी ते म्हणाले,” मौखिक परंपरेनं चालत आलेलं लोकवाङ्मय म्हणजे निव्वळ शब्दाविष्कार नसतो. त्यातून उभं राहणारं चित्र हे शतकानुशतकांच्या जीवनशैलीचं निदर्शक असतं. म्हणूनच लोकवाङ्याच्या शास्त्रीय संशोधनातून सामाजिक-सांस्कृतिक अभ्यास सिद्ध करता आला पाहिजे. रा. चिं. ढेरे, तारा भवाळकर मधुकर वाकोडे, विश्वनाथ शिंदे, शरद व्यवहारे अशा अनेकांनी तो केला आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. आजवर या मंडळींनी कधी संस्थांच्या मदतीने, तर कधी स्वतःच्या खिशाला खार लावून लोकवाङ्मयाच्या-लोकसाहित्याच्या संशोधनासाठी कष्ट उपसले आहेत. मात्र शासन स्तरावर सध्या काहीच सुरू असलेलं दिसत नाही. डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपल्या कामाच्या झपाट्याने नावारूपाला आणलेली ‘महाराष्ट्र लोकसाहित्य समिती’ सध्या बासनात गुंडाळल्यातच जमा आहे. खरंतर या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसाहित्य-लोकवाङ्मयाचा नव्याने धांडोळा घेणं शक्य आहे. किंबहुना हीच वेळ आहे, मौखिक परंपरेनं चालत आलेलं लोकवाङ्मय जतन करण्याचा आणि पुढच्या काळात त्याचा अन्वयार्थ लावण्याचा. कारण हे मौखिक शब्दभंडार ज्यांच्यापाशी आहे, ते आता शेवटची घटका मोजत आहेत. पुढच्या काळात कदाचित इच्छा असूनही आपण काही करू शकणार नाही!” यावेळी पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. डाॅ. मनोहर जाधव यांनी सत्राध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेचे सदस्य व अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी संशोधन केंद्र प्रमुख प्रो. डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘लोकवाड्मयाच्या संशोधनातील वाटा आणि वळणे/पळवाटा, चकवे आणि उतारे’ याविषयी शोधनिबंध सादर केला. याप्रसंगी सत्राध्यक्ष म्हणून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर देसाई यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समारोप समारंभाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रो. डाॅ. तुकाराम रोंगटे यांनी लोकसाहित्याचे संशोधन: सद्यस्थिती आणि गती, लोकसाहित्य विषयातील विद्यापीठीय संशोधनावर एक क्ष-किरण, १९६० नंतरचे मराठी लोकसाहित्य, लोकसाहित्य संशोधनातील सामाजिक मूल्यांचे वर्तमान औचित्य याविषयी सविस्तर सोदाहरण चर्चा केली. चर्चासत्राच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रो. डाॅ. शिरीष लांडगे यांनी मार्गदर्शन केले. आभार चर्चासत्राचे संयोजक प्रा. डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले.

Related Articles

Back to top button