कृषी

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा आलेख नेहमीच उतरता का?

कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी आज आर्थिक दृष्टीने सक्षम आहे का असं जर आपल्याला कोणी विचारलं तर ते सांगायला कोण्या जोतिष्याची गरज पडणार नाही हे वास्तव आहे. शेतकरी नेहमीच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आला आहे. त्याचा कधी गारपीठ व अतिवृष्टीशी संघर्ष, कधी दुष्काळ, वादळवाऱ्याशी संघर्ष, खराब हवामानाशी संघर्ष, मजुरांच्या तूटवड्याशी संघर्ष, व्यापाऱ्यांशी संघर्ष, खते, औषधं यांच्या भरमसाठ किंमतीशी संघर्ष तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणाशी संघर्ष… या सर्व संकटाशी लढताना तो मात्र पूर्णतः हतबल झाला आहे.

आज शेतमाल व दुध सोडता सर्व वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतमाल व दुध यांच्या किंमती वाढन्याऐवजी कमी होत चालल्या आहेत हिच मोठी शोकांतिका आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी माल बाजारात नेला की व्यापारी लोक कारणं सांगतात लॉकडाउन चालु आहे. गिऱ्हाईक कमी आहे, शेतमालाची आवक जास्त आहे. अशा परिस्थितीतही तो पोटच्या पोराप्रमाणे पिकविलेला आपला शेतमाल कवडीमोल बाजारभावात विकतो व दुसरीकडे शेतमाल सोडता दुसऱ्या कोणत्याही दुकानात आपण जर वस्तू खरेदीसाठी गेलो तर त्यांची अनेक कारणे असतात लॉकडाउन चालु आहे, थोडाच माल शिल्लक आहे, वाहतूक बंद आहे, दुकान थोडयाच वेळ सुरु आहे अशी कारणे देऊन दुकानदार आपल्या टिकाऊ वस्तू वाढीव दराने आपल्याला विकतो ही खेदाची गोष्ट आहे.पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाबरोबर सर्वच वस्तु महागल्या आहेत. सर्वच कंपन्यानी आपल्या उत्पादित वस्तूंची विक्री घटू नये म्हणून तीच किंमत ठेऊन त्या वस्तूंचे वजन, आकारमान दिवसेंदिवस कमी करत चालले आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाचा 100 किलोचा क्विंटल 80 किलोचा करायला काय हरकत आहे? 

दुधदराचीही खुप बिकट अवस्था आहे. दुधाचे दर कमी झाले तर दुधापासून तयार होणारे उपपदार्थ म्हणजेच पेढे, श्रीखंड, दही, ताक, लस्सी तसेच पशुखाद्य व जनावरांच्या औषधं यांच्या किंमती कमी का होत नाहीत? प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनीच झळ का सोसायची?आपली अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे मग कृषी क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प का असु नये? ही प्रभावी मागणी आपली इथून पुढील काळात असली पाहिजे. आपल्या शेतातील पीक ऊन, वारा, पावसात बिनधास्त ठेऊन झोपणारा शेतकरी म्हणजे जगातील एकमेव उदाहरण आहे. एवढं करूनही त्याच्या नशिबी नेहमीच अंधार आहे.

सर्वप्रथम आपल्याला शेती सोडून नोकरी करण्याची वेळ का आली? या गोष्टीचं कधी कोणी आत्मचिंतन केलं का? त्याला अनेक कारणे आहेत मात्र सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपणच आपले भक्षक आहोत. कारण आपणच शेतीसंबंधित आपल्या मागण्या, मूलभूत हक्क, सार्वभौमत्वासाठी कधी एकत्र आलोच नाही. या काळ्या मातीत आपला जन्म झाला शेवटदेखील याच मातीत आहे मग या मातीसाठी आपण कायदेशीर लढाई खऱ्या अर्थाने लढलोच नाही. तुम्ही जरी आता बाहेर नोकरीला असाल तरी तुमचे माता-पिता आजही शेतात राबत आहेत व या शेतात काम करून तुम्हाला शिकवून तुम्ही आज त्या पदावर आहात. त्यामुळे आज अशी परिस्थिती झाली आहे कि काही तरुणांना नोकरी असल्यामुळे शेतीच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होतं आहे. याच गोष्टींचा फायदा व्यवस्था उचलत असते. त्यात शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने बळी पडतो. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आपणच आपले भक्षक तर होऊ पहात नाही ना?असा प्रश्न एखाद्याला पडल्यास त्यात नवल वाटायला नको. ही परिस्थिती जर अशीच चालु राहिली शेतीच्या समस्या तर वाढतीलच पण बेकारी व गरिबीही वाढेल. परिणामी एक दिवस तरुणांच्या सहनशीलतेचा अंत नक्कीच होईल त्या दिवशीचा तरुण एक तर आपल्या मूलभूत हक्क व मागण्या संघटित होऊन मान्य करून घेईल व ताठ मानेने मार्गक्रमण करेल किंवा निष्क्रिय व्यवस्थेला कंटाळून एखाद्या कट्टर संघटनेचा सदस्य तरी असेल मात्र त्या दिवशी तो मानवतेचा दुश्मन नाही तर निष्क्रिय व्यवस्थेचा नक्कीच दुश्मन असेल. आज आपल्या शेताचा थोडासा बांध शेजारील शेतकऱ्यांनी जर कोरला तर आपण भांडण, हाणामाऱ्या करून ते प्रकरण पार कोर्ट-कचेरीपर्यंत नेतो मात्र तेवढीच तत्परता शेतकऱ्यांनी व्यवस्थेच्या निष्किय कार्यपद्धतीवर का दाखवू नये? आजपर्यंतच्या इतिहासात अनेक आंदोलने, मोर्चे निघाले, अनेक पक्ष, संघटना निर्माण झाल्या, अनेक निवडनुका झाल्या, अनेक जाहीरनामे, विधेयके मांडली, अनेक भाषणे, मेळावे झाले, अनेक आश्वासने दिली मात्र आजही माझा बळीराजा आर्थिक दृष्टीने सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे.

शेतकरी सन्मान, मदत, कर्जमाफी, योजना, दिलासा, या क्षणभंगुर व तात्पुरत्या गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना हमी पाहिजे ती पण कायमस्वरूपी… तो फक्त आपल्या श्रमाचे फळ मागतो आहे कोण्या वेतन अयोग नाही. कर्ज काढणारा शेतकरीच, कर्ज भरणारा शेतकरीच, कर्ज थकविनारा शेतकरीच व कर्जाची परतफेड न झाल्यामुळे आत्महत्या करणारा शेतकरीच आहे. मग जिवंतपणी त्याच कर्ज माफ न करू शकलेलं सरकार त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याला नुकसान भरपाई म्हणून कर्जाच्या दुप्पट रक्कम दिली जाते ही आपली व्यवस्था आहे. गेली सत्तर वर्ष शेतकरी पारतंत्र्यात जीवन जगतो आहे. त्याचा प्रत्येक प्रत्येक पाऊलोपाऊली संघर्ष आहे. त्याच्या सहनशीलतेचा जर उद्रेक झालाच तर मग कोणतीही शक्ती त्याला रोखु शकत नाही. सर्वात वाईट मला एकाच गोष्टीचं वाटतं कि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला अयोग वा समित्या नेमन्याची गरज का पडावी? शेतकरी कुटुंबातील नेते नाहीत कि काय सरकारमध्ये? असो संघर्ष हा नेहमीच त्याच्या पाचवीलाच पुजलेला असून संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच शेतकरी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अख्या जगाची खळगी भरणारा बळीराजा आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे. असंख्य दुःखाचे काटे आहेत त्याच्या वाटेवर सरकारला काय माहित त्यासाठी किती भेगा पडतात शेतकऱ्यांच्या टाचेवर…!

श्री. बाळासाहेब भोर

क्रांतीसेना, संगमनेर.
(लेखक हे राज्यशास्र विषयातुन पदवीधर आहेत)

Related Articles

Back to top button