ठळक बातम्या

पुरुष नाही पुरुषवादी मानसिकता महिलांच्या शोषणाचे कारण – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

मानिनी फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी पोलिस आयुक्तालयात मास्क वाटप
पिंपरी : कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी त्या कुटुंबातील महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. महिला आर्थिक सक्षम झाल्यास कौटुंबिक हिंसाचाराला आळा बसेल आर्थिक सक्षमतेमुळेच महिलांना सन्मान मिळेल. पुरुष नाही तर पुरुषवादी मानसिकता हे महिलांच्या शोषणाचे कारण आहे. एखादी स्त्री देखील पुरुषवादी मानसिकतेची असू शकते. यावर स्त्री-पुरुष भेदभाव न करता त्यांना समान दर्जा, समान वागणूक आणि समाजात सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने मानिनी फाउंडेशन महिलांना शारीरिक, मानसिक सामाजिक आणि आर्थिक सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय काम करीत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.

सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) मानिनी फाऊंडेशन आणि आपला आवाजच्या वतीने पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी व अधिका-यांना बारा हजार मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, डॉ. अशोक पगारीया, आपला आवाजचे संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगिता तरडे, निशिता घाडगे आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे नागरीकांना बाहेर येता येत नव्हते. त्यावेळी पोलिस कर्मचारी जीवाची पर्वा न करता अनेक दिवस फ्रंन्ट लाईन वर्कर म्हणून कर्तव्य पार पाडत होते. कंटेंटमेंट झोनमध्ये जाऊन कॉंटॅक्ट ट्रेसिंगसाठी पोलिस कर्मचा-यांनी घरोघरी जाऊन काम केले. सर्व लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. पण पोलिस आपल्या कर्तव्यात तत्पर आणि कटिबध्द आहेत. नागरीकांनी देखिल लॉकडाऊन काळात नियमांचे पालन केले. लवकरच आपण कोरोनावर विजय मिळवून पुर्वीप्रमाणे दिनचर्या सुरु करु असेही पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले.

प्रास्ताविक करताना संयोजिका व मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की, महिला साक्षरतेसाठी शहरांबरोबरच ग्रामिण भागावर देखिल लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षणाबरोबरच महिलांची उद्यमशीलता उपयोगात आणूण त्यांना रोजगार देण्यासाठी स्वत:च्या पायावर आर्थिक सक्षमतेने उभे राहण्यासाठी मानिनी फाऊंडेशन काम करीत आहे. उद्योग व्यवसायाबरोबरच महिलांना समाजकार्यात पुढे येण्यासाठी पाठबळ दिले जाते. मानिनी फाऊंडेशनची स्थापना पिंपरी चिंचवडमध्ये झाली. परंतू महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, डेहराडून येथेही संस्थेचा कार्यविस्तार झाला आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button