तहसील कार्यालयात झालेल्या सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले तसेच साऊ एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस उपस्थित होते.
शासनाच्या नियमानुसार मिशन वात्सल्य समितीची सभा दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी होणे आवश्यक आहे. मात्र राहुरीत सलग तीन महिने सभा न झाल्याने अशासकीय सदस्य आप्पासाहेब ढूस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व तहसीलदारांना नियमित सभा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राहुरीत ही सभा पार पडली.
सभेत तालुक्यातील एकल महिलांची गावनिहाय गणना करणे, एकल बालकांचा शोध घेऊन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, एकल महिलांच्या प्रश्नांना सर्व शासकीय कार्यालयांत प्राधान्य देणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचविणे, वैद्यकीय बिलात सवलतीसाठी रुग्णालयांशी समन्वय साधणे, मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करणे आणि वारसा हक्क व मालमत्ते संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी विशेष मदत करणे, असे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेच्या शेवटी अशासकीय सदस्य आप्पासाहेब भिमराज ढूस यांनी तहसीलदार डॉ. अमित पवार यांचे आभार मानत, "मिशन वात्सल्य समितीच्या माध्यमातून एकल महिला व बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने नियमितपणे अशीच कार्यवाही करावी," अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या या सभेमुळे राहुरी तालुक्यातील एकल महिला आणि एकल बालकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला नवी गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 टिप्पण्या