सामाजिक कार्य करताना प्रामाणिक भावना जपली पाहिजे - अविनाश गलांडे


श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश गलांडे यांचा उंदीरगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन सुरेश गलांडे होते. यावेळी अशोक कारखान्याचे चेअरमन सोपानराव राऊत, व्हा. चेअरमन दिगंबर शिंदे, संचालक विरेश गलांडे, माजी सभापती शरदराव नवले, आदिनाथ झुरळे, बाबासाहेब आदिक, भाऊसाहेब कहांडळ, बाबासाहेब काळे, भाऊसाहेब बांद्रे, नानासाहेब गलांडे, काजी इस्माईल शेख, अध्यात्मिक विकास आघाडीचे अध्यक्ष बबनराव मुठे, सरपंच प्रतिभा गोलवड, नारायण बडाख, कचरू औताडे, सुदाम औताडे, गणेशराव भाकरे, रामभाऊ कासार, हरिभाऊ पटारे, काकासाहेब शेजूळ, सतीश नाईक, रामचंद्र आव्हाड, बाळासाहेब पडोळे, दिलीप गायके, सुभाष बोधक आदी मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात रवींद्र सरोदे यांची कन्या पूजा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसेच पांडुरंग राऊत यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर यांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अविनाश गलांडे यांनी चार टर्म महालगाव जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले असून शिवसेना-भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी यापूर्वी संभाजीनगर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. कै. माजी आमदार आर. एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात कार्याची सुरुवात केली.

यावेळी सुरेश गलांडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विरेश गलांडे, शरद नवले, भाऊसाहेब बांद्रे, बबनराव मुठे, सतीश नाईक आदींनी मनोगत व्यक्त करत अविनाश गलांडे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भविष्यात त्यांनी आमदार, खासदार म्हणूनही कार्य करावे, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

सत्काराला उत्तर देताना अविनाश गलांडे म्हणाले की, “माझा सत्कार जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर होत असल्याचा मला अभिमान वाटतो. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, मात्र सामाजिक कार्याची आवड कायम होती. समाजकारण करताना प्रामाणिक भावना जपली पाहिजे. सर्वसामान्यांच्या सहकार्यामुळेच मला हे पद मिळाले. वैद्यकीय, शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी निःसंकोच संपर्क साधावा.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले. उंदीरगाव ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या