कन्नडचे किरण खरे यांचा देशातील टॉप आयपीएस मध्ये सन्मान


छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील किरण प्रभाकर खरे यांची फेम इंडिया–एशिया पोस्ट यांच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशाभरातील कार्यरत असलेल्या ४५५४ आयपीएस अधिकाऱ्यांमधून निवडलेल्या टॉप १०० उत्कृष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या यादीत निवड झाली आहे. ही कन्नड तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

सध्या किरण खरे हे तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पोलिस उपायुक्त, दक्षिण विभाग म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्यनिष्ठा, प्रभावी नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासकीय कार्यपद्धती आणि जनसेवेची बांधिलकी यामुळे त्यांनी पोलिस विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरातील कार्यरत आयपीएस अधिकाऱ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड या यादीसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये श्री. खरे यांचा समावेश होणे ही कन्नड, छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण मराठवाड्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

किरण खरे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांचे जावई आहेत. डॉ. सोळंके हे मूळचे चिमणापूर, ता. कन्नड येथील रहिवासी असून कृषी संशोधन व विस्तार कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कन्नडच्या मातीतून घडलेले किरण खरे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर मिळविलेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवकांना प्रशासन, पोलिस सेवा तसेच स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून देशसेवेची प्रेरणा मिळणार आहे.

“कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेच्या माध्यमातून आपल्या मातीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या किरण खरे यांचा सन्मान हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना व्यक्त करत सोळंके परिवारासह परिसरातील नागरिकांनी श्री. खरे यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या