शहागड डेअरी फार्मकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड!


गावाच्या इतिहासातील विक्रमी ६ रुपये प्रतिलिटर रेबेट; २२ लाख रुपयांची अनामत व बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

संगमनेर (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे पेमगिरी येथील शहागड डेअरी फार्मने यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. संस्थेने गावच्या आजवरच्या इतिहासातील विक्रमी ६ रुपये प्रतिलिटर रेबेट अनामत जाहीर करून दूध उत्पादकांच्या आर्थिक समाधानात भर घातली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि शेतीसमोरील विविध संकटांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

यंदाच्या वर्षात शहागड डेअरी फार्मने सुमारे ३ लाख ७० हजार लिटर दूध संकलित केले असून, या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. अनामत व बोनसपोटी सुमारे २२ लाख रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मागील दिवाळीपासून यंदाच्या दिवाळीपर्यंतची कोणतीही देय रक्कम प्रलंबित न ठेवता उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत देण्याची परंपरा संस्थेने कायम राखली आहे.

अभ्यासपूर्ण सूक्ष्म नियोजन, गुणवत्तापूर्ण दूध संकलन, पारदर्शक आर्थिक व्यवहार आणि उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणारा कारभार या बळावर शहागड डेअरी फार्मने अल्पावधीतच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. केवळ दूध संकलन न करता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

यापुढील काळातही दूध उत्पादकांना अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी संस्था सकारात्मक नियोजन करणार असल्याचे योगेश शेटे व अमित डुबे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला आणि हक्काचे पैसे वेळेत मिळणे, हीच आमच्यासाठी सर्वांत मोठी समाधानाची बाब असल्याची भावना सचिव योगेश डुबे यांनी व्यक्त केली.

दुग्ध व्यवसायाबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त भाव मिळावा, यासाठी शहागड फार्मर प्रोड्युसर कंपनीनेही पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, मका, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर तसेच इतर कडधान्यांच्या खरेदी केंद्रांना सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातच रास्त दराने शेतीमाल खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.

याशिवाय भविष्यात शेतकऱ्यांसाठी विविध वैयक्तिक लाभाच्या आणि अनुदानित योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे नियोजन आहे. एकीकडे दूध उत्पादकांना विक्रमी रेबेट व बोनस, तर दुसरीकडे शेतमाल खरेदीची सुविधा आणि भविष्यातील अनुदानित योजनांचे नियोजन, अशा विविध उपक्रमांतून शहागड डेअरी फार्म व शहागड फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उचललेले पाऊल परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या