जनजातीय गौरव सप्ताहानिमित्त कळंब येथे आदिवासी बांधवांसाठी 'शासकीय दाखले व कागदपत्रे शिबिर' उत्साहात संपन्न


शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

कळंब (प्रतिनिधी): क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १२ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरात 'जनजातीय गौरव सप्ताह' साजरा केला जात आहे. याच औचित्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर आणि तहसील कार्यालय, कळंब (जि. धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) कळंब तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी विशेष 'शासकीय दाखले व कागदपत्रे शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते.

येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रांची अडचण येऊ नये आणि सर्व दाखले एकाच छताखाली मिळावेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरामध्ये तालुक्यातील आदिवासी बांधवांचे जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र यांसाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच नवीन रेशन कार्ड काढणे, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, रेशन कार्ड विभक्त करणे (विभागणी) यांसह इतर महत्त्वाच्या शासकीय दाखल्यांबाबत तहसीलदार हेमंत ढोकले आणि नायब तहसीलदार गोकुळ भराडीया यांनी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले, नायब तहसीलदार गोकुळजी भराडीया, उपकोषागार अधिकारी बाबासाहेब गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते राकेश कोमटवार, अनिल हजारे, यशवंत किसान विकास मंचाचे अमोल शेळके आणि आदिवासी बांधव तात्यासाहेब काळे, बळभीम पवार, संतोष काळे, प्रकाश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक व नोडल अधिकारी एल. एम. रचावाड यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले, तर कनिष्ठ लिपिक एस. बी. काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ लिपिक शरद काळे, गणेश नन्नवरे, मच्छिंद्र कोळेकर, रवींद्र बोंदर, विजय कांबळे यांच्यासह सेतू सुविधा केंद्राचे सुदीप देवकर, जीवन कोळपे, वैष्णवी भिसे, साक्षी शिंदे आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या