चैतन्य म्हसेची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड; गावातून जल्लोषात मिरवणूक!


राहुरी : तालुक्यातील कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी चैतन्य सचिन म्हसे याची केरळमधील थुंबा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे. चैतन्यच्या या उल्लेखनीय यशामुळे कोंढवड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या यशाचा आनंद ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जल्लोषात साजरा केला.

लहान वयातच विज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी चैतन्यला मिळणार असल्याने त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून त्याला भारताची अंतराळ संशोधनातील प्रगती, अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान तसेच अवकाश संशोधनाच्या विविध पैलूंची जवळून माहिती घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, विज्ञान-तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि संशोधन क्षेत्रातील भविष्यातील संधींची ओळख करून देणे, या दृष्टीने ही सहल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चैतन्यच्या यशामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीसाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.

चैतन्यच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवड येथील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, कोंढवड सेवा संस्थेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या