उंदीरगावहून श्री खाटूश्याम यात्रेला उत्साहात प्रारंभ; आठ दिवसांत विविध तीर्थक्षेत्रांसह ऐतिहासिक स्थळांचे होणार दर्शन


श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : तालुक्यातील उंदीरगाव येथून श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स यांच्या वतीने व अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पा. गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या श्री खाटूश्याम यात्रेला शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या बसेस वैजापूर मार्गे राजस्थानच्या दिशेने रवाना झाल्या.

यावेळी श्रीक्षेत्र गोदाधाम मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यासह ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देत सुखरूप व मंगलमय प्रवासासाठी आशीर्वाद दिले. ही यात्रा तब्बल आठ दिवसांची असून यात्रेदरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश व परिसरातील अनेक धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना भेट देऊन भाविकांना विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.

यात्रेच्या नियोजित कार्यक्रमामध्ये मांडू येथील राणी रूपमती महाल, चित्तोडगड येथील राणा कुंभ पॅलेस, विजयस्तंभ व कालिका माता मंदिर, सावरीया सेठ श्रीकृष्ण मंदिर, पुष्कर येथील ब्रह्माजी मंदिर व पुष्कर सरोवर, रंगजी मंदिर व वराह मंदिर, अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गा व जैन मंदिर, जयपूर येथील हवा महल, जंतर-मंतर व पिंक सिटी, सालासर बालाजी मंदिर व हनुमान मंदिर, खाटूश्याम मंदिर, उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व भैरवनाथ मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तसेच माहेश्वर येथील अहिल्याबाई होळकर राजवाडा आदी महत्त्वाच्या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे.

या यात्रेसाठी सुरेश पा. गलांडे, संचालक राजेंद्र पा. पाऊलबुद्धे, बाबासाहेब काळे, दिलीपराव नाईक, बाबासाहेब आदिक, राजेंद्र गिऱ्हे, चित्रसेन गलांडे, सुरेश शिंदे, भगवानराव ताके, हरिभाऊ भालदंड, गेणूबाबा भालदंड, हरिभाऊ पटारे, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब रोकडे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवरांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाचा संगम असलेल्या या यात्रेमुळे उंदीरगाव परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या