भूमिपूजनानंतर संत तेरेजा चर्च, हरेगाव मतमाऊली भक्तिस्थान येथील चर्च प्रांगणात भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्लोबल डिफेन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे तसेच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात गणेश निबे यांनी सांगितले की, हरेगाव येथे उभारण्यात येणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प असून आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान ५ हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रकल्पाची आखणी करण्यात आली.
ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पामध्ये ॲम्युनिशन मॅन्युफॅक्चरिंग, सीएनजी व बायोगॅस प्रकल्प यांसह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे हजारो नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून स्थानिक युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षणही मिळणार आहे.
ग्लोबल डिफेन्स प्रकल्पामुळे भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेला नवी दिशा मिळणार असल्याचे निबे यांनी नमूद केले. दारुगोळा आणि स्फोटके या महत्त्वपूर्ण सामरिक क्षेत्रात उत्पादन क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट असून त्यातून स्वदेशी तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि सामरिक आत्मनिर्भरता अधिक बळकट होण्यास मदत होईल.
संरक्षण उत्पादनासोबतच हरित ऊर्जेलाही प्राधान्य दिले जाणार असून देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हरित ऊर्जा निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आज ऐतिहासिक पर्वाची सुरुवात’ — ना. विखे पाटील
भूमिपूजन समारंभात बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आज एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होत आहे.” अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आकारीपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणे आणि देशातील मोठ्या ॲम्युनिशन प्रकल्पाची हरेगाव येथे सुरुवात होणे, या दोन महत्त्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही त्यांनी आभार मानले.
खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटपाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाने घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. या लढ्यात खासदारांसह गिरिधर आसने, ॲड. अजित काळे आणि अन्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले.
आकारीपडीत शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय हा प्रकल्प सुरू करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठीही प्रयत्न करण्यात आले. आज देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून अशा प्रकल्पांमुळे त्याला आणखी बळ मिळणार आहे, असे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
“गणेश निबे आज देशाच्या नकाशावर झळकले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. आपल्या भागात उभारला गेलेला हा प्रकल्प अभिमान वाटावा असा आहे,” असेही ना. विखे पाटील यांनी नमूद केले.
यावेळी बाबासाहेब काळे, गिरिधर आसने, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपाध्यक्ष दीपक अण्णा पटारे, डॉ. शंकरराव मुठे, नानासाहेब पवार, इंद्रभान थोरात, बाबासाहेब चिडे, दिलीप त्रिभुवन, उंदीरगावचे जितेंद्र गोलवड, वीरेश गलांडे, बाबासाहेब नाईक, गणेशराव मुदगुले, शरद नवले, भाऊसाहेब बांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीरामपूर येथील प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांचा ना. विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हरेगाव मतमाऊली तीर्थक्षेत्राच्या वतीने रे. फा. डॉमनिक रोझारिओ आणि फा. फ्रान्सिस ओहोळ यांनी ना. विखे पाटील यांचा सत्कार केला.
हरेगावमध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी, युवक, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी विकासाची नवी दारे खुली होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, श्रीरामपूर तालुक्याच्या औद्योगिक विकासाला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.

0 टिप्पण्या