धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचा भाकृअप-शेतकरी प्रथम प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने फुले समृद्ध गाव तांभेरे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून आणि ‘खेत वाचवा’ अभियानांतर्गत तांभेरे व कानडगाव येथील शेतकऱ्यांसाठी ‘हरभरा व रब्बी ज्वारीचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर हे प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. दोडके बोलत होते.
यावेळी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, शेतकरी प्रथम प्रकल्पाचे सहसमन्वयक तथा प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, ज्वारी कृषीविद्यावेत्ता डॉ. दत्तात्रय पाचरणे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेश भारती, हळगाव कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गोकुळ वामन, मेंढी प्रकल्प प्रमुख डॉ. रवींद्र निमसे, सहाय्यक कृषी अधिकारी प्रभात अंत्रे आणि प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गागरे उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पंडित खर्डे यांनी ‘फुले समृद्ध गाव’ या संकल्पनेची उद्दिष्टे व महत्त्व विशद करून प्रास्ताविक केले. डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञानाची पंचसूत्री स्पष्ट करून अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली. डॉ. महेश भारती यांनी हरभरा पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन व सुधारित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. सचिन सदाफळ यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विस्तार व शेतकरी हिताच्या उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी प्रभात अंत्रे यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गागरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षणाच्या निमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारीचे बियाणे तसेच आवश्यक कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर, पीक व्यवस्थापनाचे शास्त्रीय नियोजन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्पादन खर्चात बचत करून अधिक उत्पादन मिळविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेडगे यांनी केले, तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण मगर व राहुल कोऱ्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या