राहुरी (प्रतिनिधी) : ग्रामीण पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटनेची बळकटी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने व समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांनी केले.
निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार (दि. २१ जून) रोजी राहुरी तालुक्यातील धर्माडी टेकडी गेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटनेच्या आगामी उपक्रमांचे नियोजन, ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच कार्यकारिणीतील नवीन नियुक्त्या व पदोन्नती जाहीर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना भोसले म्हणाले की, पत्रकार संघाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि ग्रामीण पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्य करणे गरजेचे आहे. पत्रकारांसह समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्यही संघटनेने करावे.
बैठकीत संघटनेच्या कार्यकारिणीतील विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये दीपक मकासरे यांची राहुरी तालुका उपाध्यक्षपदी तर प्रमोद डफळ यांची तालुका सचिवपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली. नव्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून नगररचनाकार पदावर नियुक्ती झालेल्या प्रतीक संतोष बनसोडे (कोल्हार खुर्द) यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. बैठकीदरम्यान संघटनेच्या विस्तारासाठी आवश्यक उपाययोजना, ग्रामीण पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या, पत्रकारांच्या हक्क व संरक्षणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे, जिल्हा सहसचिव राजेंद्र पवार, जिल्हा संघटक आर. आर. जाधव, तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, तालुका उपाध्यक्ष दीपक मकासरे, तालुका सचिव प्रमोद डफळ, मधुकर म्हसे, दिनेश गायकवाड, आप्पासाहेब मकासरे, देवेंद्र शिंदे, अनिकेत विधाटे, दीपक साळवे, उमेश बाचकर, प्रशांत जोशी, युनुस शेख यांच्यासह अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.
नवनियुक्त व पदोन्नती झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीचे सूत्रसंचालन अशोक मंडलिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद डफळ यांनी केले.

0 टिप्पण्या