
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. संजय कोळसे, डॉ. प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प) तसेच किटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. सखाराम आघाव यांनी तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले आहे.
तुडतुड्यांची पिल्ले व प्रौढ अवस्था पाने, मोहोर व लहान फळांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे फुलकळ्या व फुले कोमेजून गळून पडतात, तसेच नुकतीच लागलेली लहान फळे मोठ्या प्रमाणात गळतात. या किडीच्या चिकट गोड स्रावावर काळी बुरशी (सूटी मोल्ड) वाढून प्रकाशसंश्लेषणात अडथळा निर्माण होतो. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात 20 ते 100 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. पालवी किंवा मोहोरावर 10 तुडतुडे आढळल्यास ही आर्थिक नुकसान पातळी समजून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाय
तुडतुडे किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी आंबा झाडांची योग्य छाटणी करून बागेत हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील याची दक्षता घ्यावी. बाग तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळून संतुलित खत व्यवस्थापन करावे.
प्रादुर्भावाच्या सुरुवातीला ॲझाडिरॅक्टीन (10000 पी.पी.एम.) या निमयुक्त किटकनाशकाची 2 ते 3 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मोहोर येत असताना लेकॅनीसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्लिया या जैविक बुरशीयुक्त किटकनाशकाची 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास व मित्र किटकांचे संवर्धन लक्षात घेऊन बुप्रोफेझिन (25% एस.सी.) 1 ते 2 मिली, फ्लोनिकॅमिड (50% डब्ल्यू.जी.) 0.4 ग्रॅम, पायमेट्रोझाईन (50% डब्ल्यू.जी.) 0.3 ग्रॅम, टोलफेनपायरॅड (15% ई.सी.) 2 मिली, इमिडाक्लोप्रिड (17.80% एस.एल.) 0.4 मिली किंवा थायामेथोक्साम (25% डब्ल्यू.जी.) 0.1 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात आलटून-पालटून फवारणी करावी. ही सर्व किटकनाशके लेबलक्लेमप्राप्त असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी बागेची नियमित पाहणी करून तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळताच वरील शिफारशीनुसार त्वरित उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील हॉर्टसॅप प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.
1 टिप्पण्या
एकात्मिक किड नियंत्रण करण्यासाठी सोलर लाईट ट्रॅप किती प्रभावी आहें त्याबद्दल माहिती मिळावी
उत्तर द्याहटवा