श्रीरामपूर : बेलापूर कंपनी हायस्कूल हरेगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित या विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोशनीताई डांगे उपस्थित होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोशनी डांगे म्हणाल्या, “भविष्यात नावलौकिक मिळवायचा असेल तर दहावीचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच वळणावर तुमच्या आयुष्याची दिशा ठरते. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून ध्येय निश्चित करा. वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदांवर जाण्याचे स्वप्न पाहा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल.”
त्यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, “मीही ध्येय निश्चित करूनच आज या पदावर कार्यरत आहे.” मोबाईलचा योग्य वापर करण्याचे आवाहन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, मात्र त्याचा गैरवापर टाळावा, असे स्पष्ट केले.
वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करताना त्यांनी सांगितले की, वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून युवक व अल्पवयीन मुले अधिक प्रमाणात अपघातग्रस्त होतात. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वाहन चालविण्याचा परवाना घ्यावा, अन्यथा नियमभंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी सूचना त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार गोविंदराव आदिक व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वमने यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेसाठी साउंड सिस्टीम संच रोशनी डांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी मुख्याध्यापक झिने यांनी विद्यार्थ्यांना पेन व रायटिंग बोर्ड भेट दिले.
अध्यक्षस्थानावर र. कृ. औताडे विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंडलिकराव शिरोळे, मातापूर येथील मुख्याध्यापक विजय थोरात, कंडारे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष संतोष वेताळ, सदस्य रेणुका संतोष पाटील, बाबासाहेब गवारे, शेख, साळवे, पत्रकार बी. आर. चेडे तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या