प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्षभेट उपक्रम; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश


राहुरी : स्मृतींना सामाजिक कार्याची जोड देत कै. चांगदेव बापू वने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वने कुटुंबीयांनी पर्यावरणपूरक वृक्षभेट उपक्रम राबवून एक आदर्शवत संदेश दिला. श्रद्धांजली सोबत समाज प्रबोधनाचा संगम घडवत “पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा” हा प्रभावी संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

वने वस्ती, ब्राम्हणी येथे आयोजित कार्यक्रमात आळंदी देवाची येथील ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर यांनी आपल्या ओजस्वी व मार्मिक कीर्तनसेवेतून जीवनमूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कीर्तनामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिकतेची उंची लाभली. त्यानंतर “एक व्यक्ती - एक वृक्ष” या संकल्पनेवर आधारित वृक्षभेट उपक्रम राबविण्यात आला. कै. चांगदेव वने यांचे सुपुत्र किशोर वने आणि पोलीस उपनिरीक्षक गोविंद वने यांनी ५०० केसर कलंब आंब्याची रोपे तसेच १०० आयुर्वेदिक आवळ्याची रोपे वाटप केली.

उपस्थितांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे पुण्यस्मरण कार्यक्रमाला नवे व सकारात्मक स्वरूप प्राप्त होत असल्याचे मत व्यक्त केले. केवळ श्रद्धांजलीपुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देण्याचा कुटुंबीयांचा प्रयत्न सर्वांच्या मनाला भावला. कै. चांगदेव वने यांच्या स्मृतींना हिरवाईची जोड देत भविष्यात ही झाडेच त्यांच्या कार्याची जिवंत आठवण ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या प्रसंगी क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील प्रदीप गडाख, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील मयुर भोगे, प्रमोद नागरे, पाटबंधारे विभागातील मच्छिंद्र जाधव, गणेश कोतकर, जालिंदर लांबे, ॲड. शशीकांत शिरसाट, ॲड. किशोर धनवटे, गणेश लोहकरे, अभिजीत जाधव आदींसह कुटुंबीय, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मृतींच्या छायेतून हिरवाईची वाट निर्माण करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या