उंदीरगाव येथे नवीन हनुमान मंदिर देवस्थान उभारणीचा शुभारंभ; महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न


श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : तालुक्यातील उंदीरगाव येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने नवीन हनुमान मंदिर उभारणीस प्रारंभ झाला असून या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

हनुमान मंदिराच्या विद्यमान जागेवरच नव्या मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. सुमारे ३९ x ५१ फूट तसेच ३१ x ११ फूट क्षेत्रावर भव्य आणि सुबक बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली. भूमिपूजन प्रसंगी गावातील काही दाम्पत्यांनी विधीवत यज्ञ, होमहवन व पूजन करून वातावरण भक्तिमय केले.

यावेळी मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, या ठिकाणी पूर्वीचे मंदिर जरी जुने असले तरी तेही अत्यंत सुंदर आणि श्रद्धास्थान होते. ग्रामस्थांनी नवीन व आकर्षक मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा शुभकार्याचा प्रारंभ झाला आहे. “घर जसे सुंदर असावे तसेच आपले मंदिरही भव्य व सुशोभित असावे. मंदिरात गेल्यावर मनःशांती लाभते, ताणतणाव दूर होतात. देवापुढे मन मोकळे केल्याने आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून मंदिर उभारणीत सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

“आपल्याला लाभलेले धन, श्रम आणि वेळ यांचा सदुपयोग धर्मकार्यासाठी करणे ही मोठी संधी आहे. मंदिराचे कार्य हे सर्वांचेच आहे, म्हणून मोकळ्या मनाने हातभार लावावा,” असेही ते म्हणाले. या मंगल प्रसंगी ग्रामस्थ, विश्वस्त मंडळ सदस्य, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनानंतर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लवकरच येथे भव्य व सुंदर हनुमान मंदिर उभे राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या