राहुरी- श्रीरामपूर तालुक्याला जोडणारा केटीवेअर बंधारा बनला धोकादायक; ग्रामस्थ आंदोलनाच्या भुमिकेत

आरडगांव/राजेंद्र आढाव : राहुरी-श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडल्या जाणा-या माहेगांव-मांलुजे येथील प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधा-याला अनेक समस्याने ग्रासले असुन हा बंधारा वाहतुकीच्या दुष्टीने अंत्यत धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, महालगाव, दरडगाव, लाडगाव, लाख, महाडूक सेंटर तर श्रीरामपुर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक या गावांना वरदान ठरलेला माहेगाव -मालुंजा बंधा-यावरील दोन्ही बाजुचे संरक्षण कठडे व भराव हा २०१८ सालच्या पुराच्या पाण्यात वाहुन गेला आहे. तर बंधा-याकडे जाण्या-या रस्यावर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे.
व्हिडिओ पहा : ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया...

माहेगाव-खुडसरगाव येथील विद्यार्थी देखील याच बंधा-यावरून शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून दैनंदिन प्रवास करत आहेत. त्याच बरोबर दुग्ध व्यवसायीक शेतकरी व आठवडे बाजारासाठी जाणारे गावकरी ही यावरून धोकादायक प्रवास करत आहेत. तर आठ गावासांठी लाभधारक असणा-या बंधा-याचे पाणी आडवण्यासाठी असलेल्या नादुस्त फळ्यांवर, रबरी सील तसेच प्लस्टिकवर होणारा खर्च देखील दरवर्षी लोक वर्गणीतून केला जातो.

त्यामुळे पाटबंधारे विभागाबरोबरच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहू कानडे या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालुन हा बंधारा तात्काळ दुरूस्तीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माहेगाव सरपंच शारदा आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव थेवरकर, खुडसरगाव उपसरपंच आबासाहेब पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सतिष पवार, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शरद पवार, आप्पासाहेब पवार, आप्पासाहेब देठे, ज्ञानदेव देठे, सुभाष देठे, माहेगाव उपसरपंच दत्ताञय कवडे, मालुंजे बुद्रुक सरपंच अच्युत बडाख, उपसरपंच रावसाहेब शेंडगे, तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव बडाख, गणेश बडाख, राजेंद्र शेख, नंदकुमार बु-हाडे, रामभाऊ सोळुंके, निवृत्ती बडाख, भाऊसाहेब बडाख, ॲड. कचेश्वर बडाख, मालुंजा खुर्द चे सरपंच डाॅ. सर्जेराव सोळुंके आदिंसह लाभधारक शेतक-यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या