राहुरी : राज्यात वाढत्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कुशाबापू पवार यांनी शासनाविरोधात तीव्र भूमिका घेत दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागात रानडुक्कर व इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी, महिला व लहान मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर उपाय म्हणून संवेदनशील भागात विशेष पथके नेमणे, शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी १००% अनुदान, तसेच हल्ल्यातील मृत व जखमींना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, जुगार, महिलांवरील अत्याचार, चोरी व दरोडे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांवर लगाम घालावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल वाढवून विशेष पथके स्थापन करावीत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास १४ एप्रिलपासून सुरू होणारे उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिला आहे. हे आंदोलन जनतेच्या सुरक्षेसाठी व हक्कांसाठी असल्याचे सांगत नागरिकांनीही पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले असून शासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या