पहिल्या नोव्हेनामध्ये रे. फा. संपत भोसले यांनी "चारित्र्यसंपन्न पवित्र मरीया" या विषयावर प्रभावी प्रवचन केले. त्यांनी सांगितले की, पवित्र मरीयेचे खरे सौंदर्य तिच्या रूपात नव्हते, तर तिच्या पवित्र अंतःकरणात होते. तिच्या जीवनातील चार गुण प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धाळूसाठी प्रेरणादायी आहेत.
विश्वासाच्या चारित्र्याचा उल्लेख करताना त्यांनी देवदूत गॅब्रिएलच्या संदेशानंतर पवित्र मरीयाने देवाच्या इच्छेला दिलेल्या निःसंकोच संमतीचे उदाहरण दिले. देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्या शब्दाप्रमाणे जीवन जगणे, हाच खऱ्या चारित्र्याचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नम्रतेच्या चारित्र्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, देवाची माता होण्याचा सर्वोच्च मान मिळूनही मरीया कधीही गर्विष्ठ झाली नाही. सेवा करून प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे कर्तव्य पार पाडणे, हीच तिच्या जीवनाची खरी ओळख होती.
सहनशीलतेच्या चारित्र्याविषयी बोलताना त्यांनी मरीयाच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा उल्लेख केला. निर्वासित जीवन, वधस्तंभाखाली स्वतःच्या पुत्राचा मृत्यू पाहण्याची वेदना अशा संकटांमध्येही तिने देवावरील विश्वास कायम ठेवला. संकटे ही व्यक्तिमत्त्व अधिक तेजस्वी करणारी असतात, असा संदेश त्यांनी दिला.
प्रार्थनेच्या चारित्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, मरीया प्रत्येक घटना आपल्या अंतःकरणात जपून त्यावर मनन-चिंतन करत असे. देवाशी अखंड नाते ठेवणारे प्रार्थनामय जीवनच चारित्र्य अधिक दृढ बनवते, असे त्यांनी नमूद केले.
या नोव्हेनाला हरेगावचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रिग्ज, रे. फा. राजेंद्र लोंढे, फा. सुभाष त्रिभुवन, फा. रत्नाकर दुशिंग, फा. दिलीप जाधव, फा. सुनील गायकवाड, फा. अब्राहम रणनवरे, फा. आनंद बोधक, फा. आल्विन के. तसेच नेवासा, पाथर्डी, शेवगाव, भोकर आणि परिसरातील धर्मभगिनी व हजारो भाविक उपस्थित होते.
येत्या शनिवार, दि. ११ जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या नोव्हेनामध्ये "कर्तव्यदक्ष पवित्र मरीया" या विषयावर प्रवचन होणार असून मनमाड, कोपरगाव आणि कोळपेवाडी येथील चर्चचे धर्मगुरू सहभागी होणार आहेत.

0 टिप्पण्या