राहुरी विद्यापीठ : शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित व शास्त्रीय वापर करून उत्पादन खर्च कमी करताना जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी, या उद्देशाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीतर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानांतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृदाशास्त्र विभाग व आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मेळाव्यास मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, डॉ. सुभाष घोडके, डॉ. गणेश शेळके, जलसिंचन व निचरा अभियंता डॉ. देविदास खेडकर तसेच कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाडे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भीमराव कांबळे यांनी आगामी खरीप हंगामात युरिया व इतर रासायनिक खतांना पर्यायी उपाययोजनांची माहिती देत संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. विजयकुमार पाटील यांनी पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. आनंद जाधव यांनी माती परीक्षण अहवाल आणि अपेक्षित उत्पादन सूत्रांवर आधारित खतांच्या मात्रा निश्चित करण्याचे महत्त्व पटवून दिले. ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर बोलताना डॉ. सुभाष घोडके यांनी रासायनिक खतांसोबत कंपोस्ट, हिरवळीची खते, जिवाणू खते यांचा समन्वित वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचे मार्गदर्शन केले.
पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव चौधरी यांनी अपेक्षित उत्पादन आधारित खतमात्रा व्यवस्थापनाचा अवलंब करून गहू व ऊस पिकामध्ये घेतलेल्या यशस्वी उत्पादनाचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषि अधिकारी आदिनाथ धुमाळ यांनी केले, तर गोरक्षनाथ बडदे यांनी आभार मानले.
या मेळाव्यास वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. शुभांगी कदम, कृषि सहाय्यक शेषराव देशमुख, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती जे. एन. वाडेकर, श्रीमती सी. एस. क्षीरसागर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या