जलसिंचनाचा काटेकोरपणे वापर होणे आवश्यक - कुलगुरु डॉ. विलास खर्चे


रवांडा येथील सिंचन अभियंत्यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठात भेट

राहुरी विद्यापीठ : पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी क्षारपड व चोपन होत आहेत. या मानवनिर्मित समस्येमुळे पिकांची उत्पादन क्षमता कमी होत आहे. या समस्येच्या प्रतिबंधासाठी जलसिंचनाचा काटेकोरपणे वापर होणे आवश्यक असून या महत्वपूर्ण विषयाची माहिती घेण्यासाठी विद्यापीठात आलेल्या रवांडा देशातील सर्व सिंचन अभियंत्यांना विद्यापीठात झालेल्या संशोधनाचा निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

राष्ट्रीय जल अकादमी, केंद्रीय जल आयोग, पुणे यांच्यातर्फे पाणी कार्यक्षम सिंचन प्रणालीचे नियोजन व रचना या विषयावर रवांडा सरकारच्या सिंचन अभियंत्यांसाठी तीन आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय जल अकादमी, केंद्रिय जल आयोग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रवांडा सरकारच्या सिंचन अभियंत्यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे दोन दिवसांच्या अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीचा उद्देश महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील शेतस्तरावरील प्रात्यक्षिके प्रक्षेत्र आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे हा होता. या भेटीप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी पुणे येथील जल संसाधन प्रबंधन विभागाचे संचालक मिलिंद पानपाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व विस्तार शिक्षण संचालनालयाचे डॉ. मृणाल अजोतीकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे यांनी या सिंचन अभियंत्यांच्या अभ्यास दौर्याचा उद्देश याबद्दल उपस्थितांना अवगत केले. याप्रसंगी डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की, सूक्ष्म सिंचन यावरील संशोधनाची सुरुवात सन 1972 साली महात्मा फुले कृषि विद्यापीठात झाली. सिंचन अभियांत्रिकी व सूक्ष्म सिंचनामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे महत्वपूर्ण योगदान आहे. या दोन दिवसीय भेटीमध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि अभियांत्रिकी विभाग व प्रात्यक्षिक प्रक्षेत्र (कास्ट प्रकल्प), जलसिंचन अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व्यवस्थापन प्रकल्प आणि लाईसीमीटर संशोधन केंद्र, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञान व प्रशिक्षण केंद्र, उद्यानविद्या विभागातील प्रक्षेत्र, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प आणि सूक्ष्म सिंचन प्रात्यक्षिक प्रक्षेत्र या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम, आंतरविद्याशाखा जलसिचंन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशीद, सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, विस्तार शिक्षण संचालनालयाचे डॉ. मृणाल अजोतीकर, डॉ. पोपळे, डॉ. वैभव मालुंजकर या शास्त्रज्ञांनी या भेटीप्रसंगी संबंधीत विभागांची माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या