न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न


श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील मुठेवाडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक काशीद यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बेलापूर एज्युकेशन संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालकांच्या हस्ते पारितोषिके व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

संस्थेचे सचिव शरद सोमाणी यांनी मनोगतातून शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक लवकरच मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच शाळेच्या उभारणीसाठी 1993-94 पासून सर्वांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख करत शाळेची गुणवत्ता उच्च असल्याचे सांगितले. दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. लवकरच शाळेला कंपाउंड व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख अतिथी प्रमोद कर्डीले यांनी विद्यार्थ्यांच्या हुशारीचे कौतुक करत भविष्यात विविध क्षेत्रांत हे विद्यार्थी नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शालेय शिक्षण समितीचे चेअरमन दीपक सिकची व राजेश खटोड यांनी ग्रामीण भागातील शाळांसमोरील आव्हानांवर भाष्य केले. सध्या विद्यार्थी इंग्लिश मीडियमकडे वळत असतानाही न्यू इंग्लिश स्कूलची गुणवत्ता टिकून असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या असलेल्या पत्र्याच्या खोल्यांच्या जागी लवकरच पक्के बांधकाम करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन दीपक सिकची, उपाध्यक्ष राजेश खटोड, संचालक चंद्रशेखर डावरे, शशिकांत थोरात, शेषराव मुठे, जालिंदर मुठे, माजी सरपंच अण्णासाहेब मुठे, सोसायटी संचालक संतोष मुठे, सरपंच सागर मुठे, सचिव शरद सोमाणी, संजय मुठे, जगदीश फाळके, आदिनाथ लटमाळे, राजेंद्र वाळुंज तसेच शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या