ढूस यांची ‘मिशन वात्सल्य’ तालुका समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड


राहुरी : देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा साऊ एकल महिला समितीचे तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज ढूस यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन वात्सल्य’ तालुका समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राहुरीचे तहसीलदार तथा समितीचे अध्यक्ष यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

राज्यातील विधवा, परित्यक्ता व एकल महिलांसाठी कार्य करणाऱ्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी ढूस यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने ही जबाबदारी सोपवली आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘मिशन वात्सल्य’ योजना (शासन निर्णय दि. २७ ऑगस्ट २०२१) कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी तसेच पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनाथ बालके व एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घरपोच देणे, आर्थिक सहाय्य करणे तसेच पुनर्वसन करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीत गटविकास अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समाजकल्याण विस्ताराधिकारी, कृषी व पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी आदी विविध विभागांचे प्रतिनिधी सदस्य आहेत. तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

या समितीमार्फत कुटुंब निवृत्ती वेतन, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, विमा पॉलिसी लाभ, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखले, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास आदी विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

आप्पासाहेब ढूस यांनी यापूर्वी कोणतेही पद नसताना तालुक्यातील सुमारे ३५० बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच अनेक एकल महिलांना शिलाई मशीन व हातगाड्यांचे वितरण करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. अनाथ बालकांच्या नावाने ठेवी जमा करण्याचे कामही त्यांनी केले आहे.

निवडीबद्दल बोलताना ढूस म्हणाले, “या समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्यातील सर्व एकल व विधवा भगिनी तसेच अनाथ बालकांना शासकीय योजनांचा अधिक प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व एकल महिलांची गणना करून त्यांच्या हाताला काम देणे व त्यांना स्वावलंबी बनविणे हा आमचा पुढील संकल्प आहे.” असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या