श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, सेवाभावी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान आणि अभिजात मराठी भाषा मुक्तचिंतन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तहसीलदार व शिर्डी विमानतळाचे तत्कालीन अधिकारी गुलाबराव पादीर होते.
कार्यक्रमाची सुरुवात वृद्धाश्रमातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या पूजनाने झाली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात पुस्तकनिर्मितीचा प्रवास उलगडत माजी प्राचार्य टी. ई. शेळके व पत्रकार बाबासाहेब चेडे यांच्या सेवाकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पुष्पा प्रकाशनचे प्रकाशक सुखदेव सुकळे यांनी पुस्तकाचा परिचय करून देत त्याच्या वैचारिक गाभ्याचे विश्लेषण केले.
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य शेळके व बाबासाहेब चेडे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात प्राचार्य शेळके म्हणाले, “माऊली वृद्धाश्रम आणि जानकी अनाथ विद्यार्थी वसतिगृह ही श्रीरामपूरमधील लोकसेवेची तीर्थस्थळे आहेत. सुभाष वाघुंडे आणि कल्पनाताई वाघुंडे यांनी आपले सर्वस्व अर्पण करून ही सेवा उभी केली आहे. अशा पवित्र स्थळी ‘साहित्यिक फेरफटका’चा प्रकाशन सोहळा म्हणजे अमृतपर्वणीच आहे.”
यावेळी उंबरगावचे उद्योगपती व देणगीदार हरिशेठ भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ह.भ.प. भागवतराव मुठे पाटील, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार बाबासाहेब चेडे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, कवी-गीतकार बाबासाहेब पवार, आरोग्यमित्र भीमराज बागूल, कुंडलिक खैरनार आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात गुलाबराव पादीर म्हणाले, “प्राचार्य शेळके यांचे जीवन म्हणजे ज्ञानर्षीची तपस्वी वाटचाल आहे. अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही अभिनंदनीय घटना आहे. डॉ. उपाध्ये यांचे लेखन सर्वसामान्यांसाठी केलेला प्रामाणिक आत्मसंवाद आहे.”
प्राचार्य शेळके यांच्या हस्ते माऊली वृद्धाश्रम तसेच डॉ. कैलास पवार यांच्या भूमी फाउंडेशनच्या सेवाकार्यास धनादेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव तसेच वृद्धाश्रमातील माताभगिनी व विद्यार्थ्यांनी केले. यावेळी कविसंमेलन आणि अभिजात मराठी भाषा मुक्तचिंतन सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन माऊली वृद्धाश्रमाच्या सचिव कल्पनाताई वाघुंडे यांनी केले. साहित्य, समाजसेवा आणि मराठी भाषेचा सन्मान यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

0 टिप्पण्या